Tuesday, July 14, 2026

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकनाट्य परंपरेचा अविभाज्य घटक असलेल्या दशावतार ( Dashavatar) लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सदर सर्वेक्षणाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या आठही तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती ठिकाणी विशेष नोंदणी कक्षाच्या माध्यमातून कलाकारांची नोंदणी केली जाणार आहे. ( Sindhudurg News)

या सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील दशावतार कलाकार, दशावतार मंडळे तसेच या लोककलेशी संबंधित विविध घटकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दशावतार परंपरेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि भविष्यातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. (Cultural Heritage)

दशावतार ही कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग परिसरातील समृद्ध लोकनाट्य परंपरा असून, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी ही कला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या परंपरेचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांनी आपल्या संबंधित तालुक्यातील पंचायत समिती विशेष नोंदणी कक्षास भेट देऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >