Wednesday, May 20, 2026

Punjabi Singer Inder Kaur Death : ६ दिवस बेपत्ता असलेल्या इंदर कौरचा दुर्दैवी मृत्यू; कालव्यात सापडला मृतदेह

Punjabi Singer Inder Kaur Death : ६ दिवस बेपत्ता असलेल्या इंदर कौरचा दुर्दैवी मृत्यू; कालव्यात सापडला मृतदेह

पंजाब : पंजाबी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौर (Inder Kaur) उर्फ यशइंदर कौर हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. तब्बल सहा दिवस बेपत्ता असलेल्या इंदर कौरचा मृतदेह १९ मे रोजी सकाळी लुधियानाजवळील नीलो कालव्यात आढळून आल्याने संपूर्ण पंजाबी संगीतविश्वात खळबळ उडाली आहे. अवघ्या २९ वर्षीय गायिकेच्या मृत्यूने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

इंदर कौर गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, तिला गन पॉईंटवर जबरदस्तीने किडनॅप करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे, तर कॅनडाहून आलेल्या एका व्यक्तीनं इंदरवर लग्नासाठी दबाव टाकला होता. मात्र, इंदरनं लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याच व्यक्तीनं तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा येथील एका व्यक्तीकडून इंदर कौरवर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र, इंदरनं त्या व्यक्तीचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात तिचं अपहरण केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित आरोपी हा कॅनडामध्ये राहत होता आणि विशेष कट रचण्यासाठी तो नेपाळमार्गे पंजाबमध्ये आला होता. घटना घडवल्यानंतर तो पुन्हा त्याच मार्गाने कॅनडाला फरार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी इंदरची आरोपीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. मात्र, संबंधित व्यक्ती आधीपासून विवाहित असून त्याला मुलं असल्याचं इंदरला समजताच तिनं त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे आरोपी तिच्यावर राग धरून असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी इंदर कौरचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी समराला येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.

इंदर कौरची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. १३ मे रोजी तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती ब्राउन रंगाचा शर्ट परिधान करून हातात बॅग घेत पोझ देताना दिसत होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला होता. मात्र, तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर आता त्याच पोस्टखाली चाहते शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एक मोठा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जर इंदर कौरचं सहा दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं, तर पाच दिवसांपूर्वी तिच्या अकाउंटवर पोस्ट नेमकी कोणी शेअर केली? काही नेटकऱ्यांच्या मते, ही पोस्ट आधीच शेड्यूल करून ठेवण्यात आली असावी. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंजाबी संगीतविश्वात इंदर कौर हे एक लोकप्रिय नाव होतं. तिनं ‘जीजा’, ‘किसान एंथम २’, ‘देसी सिरे दा’, ‘जट्ट माइंड’, ‘नबज जट्टी दी’ आणि ‘अकड़’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली होती. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. तिच्या अकस्मात निधनामुळे पंजाबी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >