Wednesday, May 20, 2026

Twisha Sharma Death Case : ट्विशा मृत्यू प्रकरणात नवा खुलासा; इन्स्टाग्राम चॅटमधून समोर आली धक्कादायक वेदना

Twisha Sharma Death Case : ट्विशा मृत्यू प्रकरणात नवा खुलासा; इन्स्टाग्राम चॅटमधून समोर आली धक्कादायक वेदना

भोपाळ : भोपाळमधील ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असून आता या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. अशातच आता ट्विशाचं शेवटचं इन्स्टाग्राम चॅट व्हायरल झालं असून त्यातून तिच्या मनातील वेदना आणि ती सहन करत असलेला मानसिक त्रास स्पष्टपणे समोर आला आहे.

मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी ट्विशाने तिची जवळची मैत्रीण मीनाक्षी हिच्याशी इन्स्टाग्रामवर संवाद साधला होता. या चॅटमध्ये तिने लग्नाबाबत अत्यंत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “मी फसले यार… तू नको फसू. जास्त काही बोलत नाही, पण योग्य वेळ आल्यावर तुला सगळे सांगेल,” असा मेसेज ट्विशाने केला होता. तिच्या या शब्दांतून ती आतून किती खचली होती याची जाणीव होत आहे. ट्विशाचा हा मेसेज पाहून मीनाक्षीनेही चिंता व्यक्त केली होती. “मला तुझी खूप काळजी वाटतेय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असं उत्तर तिने दिलं होतं.

दरम्यान, याआधी ट्विशाचे व्हॉट्सअॅप चॅट्सही समोर आले होते. मृत्यूच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी तिने आई-वडिलांना पाठवलेल्या मेसेजमध्ये गंभीर आरोप केले होते. “मी फार त्रस्त आहे. हे लोक अत्यंत वाह्यात आणि नीच आहेत. माझ्यावर सतत संशय घेतला जातो. माझ्या पोटात कुणाचं मूल आहे? असे प्रश्न समर्थ विचारतो. तुम्ही या आणि मला घेऊन जा. हे लोक मला जगू देणार नाहीत,” असा धक्कादायक दावा ट्विशाने केला होता. या मेसेजमधून सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाची माहिती तिने दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामध्ये राहणाऱ्या ट्विशा शर्माचं डिसेंबर २०२५ मध्ये निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आणि पेशाने वकील असलेल्या समर्थ सिंह याच्यासोबत लग्न झालं होतं. दोघांची ओळख मॅट्रिमोनियल साईट आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. मात्र काही दिवसांनंतर ट्विशाला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लग्नानंतर काही काळातच ट्विशाचा गर्भपात झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर तिची मानसिक अवस्था अधिक खालावल्याचं सांगितलं जात आहे. अखेर १२ मे २०२६ रोजी रात्री भोपाळमधील कटारा हिल्स परिसरातील घरात ट्विशाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. मात्र पोस्टमॉर्टेम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

गळफासामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असलं तरी ट्विशाच्या शरीरावर अनेक जखमांचे निशाण आढळून आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? तिला मारहाण करण्यात आली होती का? तिच्यावर आणखी कोणता दबाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून ट्विशाच्या मृत्यूमागील खरं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >