Tuesday, May 19, 2026

Prashant Kishor : प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे राजकीय सल्लागार?

Prashant Kishor : प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे राजकीय सल्लागार?

- सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक; १ जूनपासून काम सुरू करणार

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा भक्कमपणे उभे करण्यासाठी पक्षाच्या नव्या नेतृत्वाने मोठे पाऊल उचलले आहे. 'डिझाईन बॉक्स' या संस्थेने काम थांबवल्यानंतर, आता प्रशांत किशोर (पीके) राष्ट्रवादीचे नवे राजकीय रणनीतीकार म्हणून धुरा सांभाळणार आहेत. मंगळवारी, १९ मे रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १ जूनपासून प्रशांत किशोर आणि त्यांची कंपनी राष्ट्रवादीच्या ब्रँडिंग व रणनीतीचे काम अधिकृतपणे हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत सर्व प्राथमिक सोपस्कर पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या कराराच्या संदर्भातील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर प्रशांत किशोर यांची रणनीतीकार टीम प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेल. पुढील ३ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे २०२९ च्या आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राष्ट्रवादीने आत्तापासूनच राजकीय रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.

प्रशांत किशोर हे देशातील एक अग्रगण्य राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील 'जन सुराज पक्षा'चे संस्थापक आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी राबवलेली 'चाय पे चर्चा' आणि यशस्वी प्रचार मोहीम देशभरात प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशात वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन आणि दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) यांसारख्या प्रादेशिक पक्षांना सत्तेत आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नरेश अरोरांनी काम थांबवले :

यापूर्वी 'डिझाईन बॉक्स' या कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार आणि रणनीतीचे व्यवस्थापन पाहत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्यासाठी 'गुलाबी कॅम्पेनिंग' डिझाईन केले होते. 'लाडकी बहीण योजना' जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांचे गुलाबी जॅकेटमधील ब्रँडिंग, इमेज मेकओव्हर आणि संदेश व्यवस्थापन नरेश अरोरा यांच्या टीमनेच केले होते. त्याचा पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. परंतु, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 'डिझाईन बॉक्स'ने आपले काम थांबवले. आता पक्षाला या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी आणि नवीन राजकीय बळ देण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी 'पीके' यांच्या रूपाने नवीन 'चाणक्य' निवडले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >