Tuesday, July 21, 2026

Girish Mahajan : ठाकरे पक्षाला अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, नीट आंदोलनावरून गिरीश महाजनांचा ठाकरे-पवार गटावर हल्लाबोल

Girish Mahajan : ठाकरे पक्षाला अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, नीट आंदोलनावरून गिरीश महाजनांचा ठाकरे-पवार गटावर हल्लाबोल

Girish Mahajan : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा दिला जात असताना, या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवरव राज्याचे जलसंपदामंत्री तथा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार हल्लाबोल केला आहे. या पक्षांच्या आंदोलनाला माणसे मिळत नाहीत. त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, असा टोला त्यांनी लगावला.

मंत्री महाजन हे नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलन आणि राज्यात उमटणाऱ्या पडसादांवर भाष्य केले. नवी दिल्लीत परिस्थिती काय, तिथे किती गर्दी झाली, लाठीमार का झाला, हे सांगता येणार नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे लाठीमार झाला का, हा तपासाचा भाग आहे. केंद्रातील वरिष्ठ नेते दिल्लीत असून ते याबाबत लक्ष घालत आहेत, असे मंत्री महाजन यांनी नमूद केले.

कार्यकर्ते उरले नाहीत, जिथे आंदोलन होतं, तिथे हे होतात

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आंदोलने होत आहेत. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गटही सहभागी झाल्यावरून मंत्री महाजन यांनी दोन्ही पक्षांवर टिकास्त्र सोडले. ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत. “हे पक्ष मोठा गाजावाजा करतात, मात्र त्यांच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या मागे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होतं, तिथे हे जाऊन सहभागी होतात,” असा टोला त्यांनी लगावला. महाजन यांनी पुढे दावा केला की, विरोधी पक्षांकडे स्वतंत्र जनाधार उरलेला नसल्याने ते इतरांच्या आंदोलनांचा आधार घेत आहेत. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय उपस्थिती दाखवण्यासाठी ते अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना संपत नाही, तोपर्यंत राऊत गप्प बसणार नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. १५ वर्षांपासून आपण मंत्री असून कोणीही तसा आरोप केलेला नाही. खा. राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देणे बरे नाही. शिवसेना संपत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती गप्प बसणार नाही. खा. राऊत यांच्याकडून पक्षाला हानीकारक ठरेल, असे काम होत आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. तुमची हाफ पँट ठेवलेली नाही, सगळे कपडे उतरवले, असे म्हणत महाजन यांनी टीका केली. खा. राऊत यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे. जे शिल्लक आहेत, ते कुठे जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही महाजन यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >