Thursday, May 14, 2026

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित तरुणीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. (Newly wed woman died due to heat wave)

जळगावात तापमानाचा पारा तब्बल ४५.६ अंशावर पोहोचला आहे. प्रचंड उकाडा, अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि उष्ण वाऱ्यामुळे अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाह झालेल्या वैशाली सुनील मोरे या नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. भडगाव तालुक्यातील बाळद येथील माहेर असलेल्या वैशाली सुनील मोरे (वय २०) यांचा विवाह २० दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील बाळू मोरे यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. मात्र संसार फुलण्याच्या आधीच काळाने वैशालीवर घाला घातला. (Newly wed woman died due to heat wave)

प्राथमिक माहितीनुसार, वैशाली आणि तिचे पती सुनील हे दोघे मंगळवारी चोपडा तालुक्यातील एका लग्न समारंभासाठी दुचाकीने गेले होते. जिल्ह्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतानाही त्यांनी दुपारच्या कडक उन्हात प्रवास केला. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी ते घरी परतले. दिवसभराच्या प्रवासामुळे वैशाली थकल्या होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी घरातील नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचे काम सुरू केले. गॅसजवळ उभे राहून स्वयंपाक करत असतानाच अचानक त्यांना मळमळ, अशक्तपणा जाणवला. आणि चक्कर येऊ लागली. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली.

घरातील सदस्यांनी घाबरून तातडीने त्यांना नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर उष्माघाताची गंभीर लक्षणे त्यांना आढळून आली. प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government Medical College Jalgaon ) रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, रुग्णवाहिकेद्वारे जळगावकडे नेत असताना वाटेत त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोहाडी आणि बाळद गावांमध्ये शोककळा पसरली आहे. नवविवाहितेच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लग्नाच्या आनंदाचे वातावरण काही दिवसांतच दुःखात परिवर्तित झाल्याने गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, वैशाली मोरे यांना उपचारासाठी आणले तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान सुमारे १०४ अंश होते. अंगावर मोठ्या प्रमाणात सूज होती. उन्हात दीर्घकाळ दुचाकीने प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅसजवळ उभे राहून काम केल्यामुळे शरीरातील उष्णता अधिक वाढली असावी. उष्माघाताचा तीव्र परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

दरम्यान, जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराचे पुजारी श्रीहरी प्रभाकर दीक्षित (वय ६९) यांचाही उन्हाच्या तीव्र झळांमुळे मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट कायम असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >