Thursday, May 14, 2026

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही घटना १२ मे रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात असतानाही आरोपींमध्ये कायद्याची भीती नसल्याचं या घटनेतून पुन्हा स्पष्ट झालं आहे.

पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. ज्या स्लीपर बसमध्ये हा प्रकार घडला, ती बस पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला असून वैद्यकीय तपासणीनंतर FIR दाखल करण्यात आला.

हा गुन्हा बसच्या आतमध्ये घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. संबंधित महिला या बसमधून प्रवास करत होती, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. मात्र हा प्रकार नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडला आणि बसचा मार्ग काय होता, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

सध्या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे. बसमधून गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात फॉरेन्सिक आणि मेडिकल रिपोर्ट महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं जात आहे. तपास अधिकारी मजबूत केस तयार करण्यासाठी आणखी पुरावे गोळा करत असून संपूर्ण घटनाक्रमाची जुळवाजुळव केली जात आहे.

घटना घडली त्यावेळी बस सुरू होती का? त्या वेळी बसमध्ये इतर प्रवासी उपस्थित होते का? अशा अनेक मुद्द्यांवर दिल्ली पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप आरोपींची ओळख जाहीर केलेली नाही.

Comments
Add Comment