Thursday, May 14, 2026

रशियाचा फेरा वाचणार, नौदलाच्या 'या' विमानाची ‘इजेक्शन सीट’ नाशिकमध्येच दुरुस्त होणार

रशियाचा फेरा वाचणार, नौदलाच्या 'या' विमानाची ‘इजेक्शन सीट’ नाशिकमध्येच दुरुस्त होणार

नाशिक : भारतीय नौदलाला मोठा फेरा नाशिकमुळे वाचणार आहे. ओझर येथे एका लढाऊ विमानाच्या यशस्वी दुरुस्ती नंतर भारतीय नौदलाला मोठा आधार मिळणार आहे. भारतीय नौदलाच्या ‘मिग – २९ के’ या लढाऊ विमानात पहिल्या ‘इजेक्शन सीट’चे हवाई दलाच्या ओझरस्थित ११ देखभाल व दुरुस्ती केंद्रात (बीआरडी यशस्वी दुरुस्ती करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ही दुरुस्ती यशस्वी करण्यात आली. या कामासाठी भारतीय नौदलाला आपली ‘मिग – २९ के’ '(MIG-29K') विमाने रशियाला पाठवावी लागत होती. मात्र स्वदेशी तंत्रज्ञानामुळे रशियाचा मोठा फेरा मारण्याची आता गरज भासणार नाही.

प्रथमच मिग – २९ के (MIG-29K') विमानाचे ‘ओव्हरहॉल’ करण्यात आलेले इंजेक्शन सीट येथे आयोजित सोहळ्यात भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भारतीय हवाई दलाच्या देखभाल विभागाचे एओसी-इन-सी एअर मार्शल यल्ला उमेश, भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले उपस्थित होते. ओझरस्थित हवाई दलाच्या ११ बीआरडी अर्थात देखभाल-दुरुस्ती केंद्रात मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय विमानांची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरऑल) केली जाते. या केंद्राने या दोन्ही विमान ताफ्यांच्या जटील देखभाल गरजांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य, सक्षम दुरुस्ती क्षमता आणि विशेषीकृत पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.

सुखोई-३० एमकेआयच्या ‘इजेक्शन सीट’ ओव्हरहॉलमधील अनुभवाचा उपयोग करून बीआरडीने भारतीय नौदलाच्या मिग-२९ के इंजेक्शन सीटसाठी आवश्यक ओव्हरहॉल तंत्रज्ञान विकसित केले. त्यास वायुयोग्यता प्रमाणन संस्था ‘आरसीएमए’ची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची स्वदेशी देखभाल क्षमता अधिक मजबूत झाली आहे, ज्यामुळे इतर देशावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

ओझरचे देखभाल, दुरुस्ती केंद्र देशात अव्वल

दोन वर्षांपूर्वी हवाई दलाच्या ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रास ‘प्रेसिडेंट कलर्स’ मिळाला होता. २०२३ वर्षात देखभाल-दुरुस्ती कमांड अंतर्गत सर्वोत्कृष्ट दुरुस्ती केंद्राचा सन्मानही या केंद्राला मिळाला होता.देशभरातील सर्व केंद्रात ओझरचे देखभाल, दुरुस्ती केंद्र अव्वल ठरले. देशातील देखभाल दुरुस्ती केंद्रांत ओझरस्थित ११ वे हे महत्वाचे केंद्र आहे. १९७५ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रात आजवर रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्तीसह सुखोईच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली. मिग २९ लढाऊ विमानाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले. त्या अंतर्गत क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अधिक क्षमता, इंधन टाकीची क्षमता वृध्दिंगत करताना हवेत इंधन भरण्याची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment