Thursday, July 16, 2026

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (wardha Murder)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी बुधवारी, 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली होती. तिचे कुटुंब शेतमजुरी करून आपले पोट भरते. नेहमीप्रमाणे तिची आई आणि मोठी बहीण शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जेव्हा त्या शेतातील घरी परतल्या, तेव्हा त्यांना समोर दिसलेले दृश्य पाहून मोठा धक्का बसला. त्या चिमुरडीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह घरात पडून होता. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने बालिकेच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला आहे. मृतदेहाची स्थिती पाहता बालिकेवर अत्याचार झाल्याचा संशय आहे, त्यामुळे पोलिसांनी संबंधित कलमे गुन्ह्यात जोडली आहेत. मात्र, अत्याचाराबाबतचा अंतिम निष्कर्ष हा शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य आणि लोकांचा संताप पाहता या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 14 विशेष पथके तैनात केली आहेत. सध्या पोलिसांनी 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >