Wednesday, May 13, 2026

Cannes Film Festival 2026 : 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलियाची जादू; जयपूरच्या दागिन्यांनी वाढवली शोभा!

Cannes Film Festival 2026 : 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलियाची जादू; जयपूरच्या दागिन्यांनी वाढवली शोभा!

फ्रान्स : आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes Film Festival) मध्ये आपल्या स्टायलिश आणि एलिगंट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुलाबी रंगाच्या आकर्षक बॉडीकॉन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री करताच आलियाचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मात्र, तिच्या या ग्लॅमरस लूकपेक्षाही अधिक लक्ष वेधून घेतले ते तिच्या गळ्यातील खास रॉयल डायमंड नेकलेसने. या नेकलेसचा थेट संबंध जयपूरच्या पारंपरिक दागिनेकलेशी असल्यामुळे भारतीय फॅशनप्रेमींमध्येही त्याची मोठी चर्चा रंगली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चा यंदा ७९ वा महोत्सव सुरू आहे. १२ मेपासून सुरू झालेला हा महोत्सव २३ मेपर्यंत चालणार असून, जगभरातील कलाकार, दिग्दर्शक आणि फॅशन आयकॉन्स या रेड कार्पेटवर आपली छाप पाडताना दिसत आहेत. अशातच आलिया भट्टने पुन्हा एकदा भारतीय फॅशनचा ग्लोबल मंचावर उठून दिसणारा अंदाज सादर केला आहे. ‘कान्स २०२६’मधील तिचे रेड कार्पेटवरील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून तिच्या लूकचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलियाने यावेळी फिकट गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन गाऊन परिधान केला होता. या गाऊनचा स्ट्रक्चर्ड सिल्हूट, फ्रंट कट डिटेलिंग आणि स्टायलिश फिट यामुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता. गाऊनची विशेष नेकलाइन तिच्या संपूर्ण आऊटफिटला परफेक्ट रेड कार्पेट अपील देत होती. याशिवाय तिने हातावर घेतलेला ट्रान्स्परंट फ्लोई ट्रेल तिच्या लूकमध्ये रॉयल एलिगन्सची भर घालत होता. रेड कार्पेटवर चालताना त्या ट्रेलमुळे आलियाचा अंदाज अधिकच आकर्षक आणि दिमाखदार दिसत होता. तिने दिलेल्या पोज, तिचा आत्मविश्वास आणि सॉफ्ट ग्लॅम स्टाईल यामुळे तिची उपस्थिती सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारी ठरली.

फॅशन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आलिया भट्टची ‘सॉफ्ट ग्लॅम’ स्टाईल विशेषतः जेन-झी पिढीमध्ये लोकप्रिय मानली जाते. साधेपणा, क्लास आणि मॉडर्न एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ तिच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळतो. यावेळीही तिने त्याच शैलीचा प्रभावी नमुना सादर केला. मिनिमल मेकअप, ग्लोइंग स्किन आणि सॉफ्ट वेवी हेअरस्टाईलमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता.

मात्र, तिच्या संपूर्ण लूकमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या रत्नजडित नेकलेसची. आलियाने या गाऊनसोबत परिधान केलेला डायमंड नेकलेस हा जयपूरच्या पारंपरिक कारागिरीचा अप्रतिम नमुना असल्याचं सांगितलं जात आहे. Amrapali Jewels चा ‘गोलकोंडा रोझ नेकलेस’ म्हणून ओळखला जाणारा हा नेकलेस विंटेज आणि रॉयल टच देणारा होता. पिंक स्टोन्स आणि डायमंड डिटेलिंगमुळे या दागिन्याला एक वेगळीच राजेशाही झळाळी मिळाली होती. जयपूरमधील निष्णात कारागिरांनी व्हाईट गोल्डमध्ये घडवलेला हा नेकलेस भारतीय हस्तकलेचं सौंदर्य दाखवणारा ठरला.

या नेकलेसमध्ये तब्बल १६८.२७ कॅरेटचे दुर्मीळ गुलाबी कोरल, ५.५३ कॅरेटचे गोलकोंडा टाईप २A हिरे आणि २० कॅरेटचे हिरे जडवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांना मॉडर्न फॅशनसोबत कसं सादर करता येतं, याचं सुंदर उदाहरण आलियाच्या या लूकमधून पाहायला मिळालं. भारतीय दागिन्यांची श्रीमंती आणि जागतिक रेड कार्पेटचा ग्लॅमर यांचा अनोखा संगम तिच्या या लूकमध्ये दिसून आला.

यासोबतच आलियाने चोपार्ड (Chopard)चे डायमंड कानातले आणि आकर्षक अंगठी परिधान केली होती. मात्र, जास्त ज्वेलरी न वापरता तिने संपूर्ण फोकस स्टेटमेंट नेकलेसवर ठेवला. त्यामुळे तिचा लूक अधिक एलिगंट आणि क्लासी वाटत होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या या लूकला “रॉयल”, “प्रिन्सेस वाइब्स” आणि “सॉफ्ट ग्लॅम गोल्स” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, कान्स फेस्टिव्हलमध्ये आलियाने याआधीही एक वेगळा लूक सादर केला होता. ‘लँडस्केप-प्रिंटेड बॉल गाऊन’मध्ये ती प्रिन्सेस लूकमध्ये रेड कार्पेटवर झळकली होती. सिंगल-स्लीव्ह स्ट्रिप्स, डीप नेकलाइन आणि कॅनव्हास पेंटिंगची आठवण करून देणाऱ्या नाजूक प्रिंट्समुळे हा गाऊन चर्चेत आला होता. या लूकमध्ये आलियाने ‘नो ज्वेलरी’ स्टाईल निवडली होती. लो-स्विफ्ट बन हेअरस्टाईल आणि ग्लास स्किन मेकअपने तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.

विशेष म्हणजे,आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील हे सलग दुसरं वर्ष आहे. २०२४ पासून ती L'Oréal Paris ची ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही काम पाहत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्या रेड कार्पेट लूककडे फॅशन जगताचं विशेष लक्ष असतं. यंदाही आलियाने भारतीय फॅशन आणि पारंपरिक कारागिरीची झलक जागतिक मंचावर प्रभावीपणे सादर केल्याचं मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >