Tuesday, July 14, 2026

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांना त्यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट'(India's Got Latent) या शोशी संबंधित एका जुन्या प्रकरणावरून कडक शब्दांत फटकारले आहे.समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया यांचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांच्या प्रकरणावरमंगळवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल समय रैना यांच्यावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम जमा न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.याव्यतिरिक्त, या प्रकरणात पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि युट्युबर आशिष चंचलानी यांच्यावरही दंड ठोठावण्यात आला आहे.

दोघांना फटकारताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “हे स्वतःला ‘युथ आयकॉन’ म्हणवून घेतात. ते नेमके कोणत्या प्रकारचे युथ आयकॉन आहेत, हे मला माहीत नाही. याचा विचार करूनच मला चिंता वाटते. आम्हाला असे वाटते की कॉमेडियन समय रैनाने न्यायालयाची दिशाभूल केली असून आमच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले आहे.” सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, समय रैना यांनी यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही. खंडपीठासमोर आश्वासन दिल्यानंतरही त्यांचे पुढील वर्तन नोंदवलेल्या हमींशी सुसंगत नव्हते, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी सांगितले की, समय रैना कार्यक्रम करत आहेत; मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांनी एसएमए फाउंडेशन किंवा पीडित व्यक्तींशी संपर्क साधलेला नाही.(Stand-up)

न्यायालयाने म्हटले, “सार्वजनिक जीवनात तुम्ही इतरांचा जितका आदर करता, तितकाच आदर तुम्हालाही मिळतो. आम्ही त्यांना वारंवार सवलत दिली. आम्हाला वाटले होते की तुम्ही सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण आहात. पण लोकांना कमी लेखणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हा तुमच्यासाठी जणू फॅशनच बनला आहे.” कॉमेडियनच्या वकिलांनी स्पष्ट केले की, एसएमए फाउंडेशनशी संपर्क न करण्यामागे अहंकार कारणीभूत नव्हता. “न्यायालयाचे अधिकारी म्हणून आम्ही आमच्या क्लायंटला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाचे होस्ट समय रैना आणि त्यांच्या सहकारी कॉमेडियनना अपंगत्व तसेच दुर्मिळ आनुवंशिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींची खिल्ली उडवल्याबद्दल बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले होते.यानंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्या व्यतिरिक्त आणखी चार जणांची नावेही समाविष्ट होती. न्यायालयाने समय रैनाला निर्देश दिले होते की त्यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग व्यक्तींना आमंत्रित करावे. तसेच समय रैना आणि इतर संबंधितांना निर्देश देताना न्यायालयाने सांगितले होते की, दिव्यांगांच्या उपचारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या निधीला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी दर महिन्याला किमान दोन कार्यक्रम आयोजित करावेत.(Samay Raina)

त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, “अशा प्रकारच्या कृत्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. आपल्या पॉडकास्ट किंवा इतर माध्यमांद्वारे सार्वजनिकरीत्या माफी मागा. त्यानंतर तुम्ही किती दंड किंवा नुकसानभरपाई देण्यास तयार आहात, याची माहिती आम्हाला द्या.”मात्र, समय रैना आणि इतर संबंधितांकडून न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. आपल्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आर्थिक दंड ठोठावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >