Wednesday, July 15, 2026

Cricket Update : निराशाजनक पर्व

Cricket Update :  निराशाजनक पर्व

कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हे अपयश एका अग्निपरीक्षेसारखे आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेपूर्वी भारतीय संघाला केवळ रणनीतीच नाही, तर आपली मानसिकताही बदलावी लागेल. जर भारताला पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करायचा असेल, तर या पराभवातून मिळालेले धडे अमलात आणणे ही काळाची गरज आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासात २०२६ मधील जुलै महिन्यातील इंग्लंड आणि आयर्लंड दौरा एका 'निराशाजनक पर्वा'सारखा नोंदवला जाईल. जागतिक टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ ज्या पद्धतीने या दौऱ्यावर कोसळला, त्याने केवळ चाहत्यांनाच नाही, तर क्रिकेट विश्वातील तज्ज्ञांनाही थक्क केले आहे. आयर्लंडविरुद्ध २-० असा व्हाईटवॉश आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ४-० अशा दारूण पराभवाने भारतीय टी-२० क्रिकेटच्या भवितव्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळातील ही सुरुवात अत्यंत क्लेशदायक ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत भारतीय संघाने कोणतीही द्विपक्षीय मालिका किंवा स्पर्धा गमावली नव्हती. मात्र, श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची धुरा सांभाळताच हा विजयाचा रथ रुळावरून घसरला. टी-२०(T20) क्रिकेटमधील मर्यादित सामन्यांचा अनुभव घेऊन कर्णधारपदाची धुरा सांभाळणे श्रेयस अय्यरसाठी कठीण परीक्षा ठरली, ज्यात त्याला अपयश आले. साउथम्पटनमधील शेवटच्या सामन्यात भारताने २०१ धावा केल्या असल्या तरी, इंग्लंडने ज्या सहजतेने २५८ धावांचे लक्ष्य गाठले, त्यावरून भारतीय गोलंदाजी आणि रणनीती किती हतबल होती, हे दिसून येते.(India Cricket)

भारतीय फलंदाजांच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची तांत्रिक कमतरता होय. आयपीएलमधील सपाट खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव असलेल्या अनेक फलंदाजांना, इंग्लंडमधील उसळत्या आणि चेंडूला स्विंग मिळवून देणाऱ्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यात अपयश आले. भारतीय खेळपट्ट्यांपेक्षा इंग्लंडमध्ये परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. तिथे खेळपट्टीवर चेंडूला मिळणारा 'स्विंग' आणि 'सीम' हाताळण्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी, विशेषतः नवीन चेंडूने, भारतीय फलंदाजांना स्विंगच्या जाळ्यात अडकवले. चेंडू हवेत आणि खेळपट्टीवर उसळत असल्याने भारतीय फलंदाजांची तांत्रिक बाजू उघडी पडली. यामुळेच प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्येच भारताने आपल्या महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आणि संघावर सुरुवातीपासूनच दडपण आले. पाटा खेळपट्ट्यांवर सहज फटके मारणारे फलंदाज, इंग्लंडच्या हवामानात चेंडू स्विंग व्हायला लागताच गोंधळून गेले. चेंडू नेमका कुठे 'पिच' होतोय आणि तो कोणत्या दिशेला वळतोय, याचा अंदाज घेण्याऐवजी ते आक्रमक फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. फलंदाजीप्रमाणेच भारतीय गोलंदाजांनीही या मालिकेत निराशा केली. इंग्लंडची फलंदाजी खूप आक्रमक होती, यात शंका नाही, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखण्यासाठी कोणतीही कल्पकता दाखवली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला, तेव्हा भारतीय गोलंदाज धावगती रोखण्यासाठी कोणतीही रणनीती आखताना दिसले नाहीत.

भारतीय गोलंदाजी ही सर्वात ताकदवान मानली जाते, पण इंग्लंडच्या मैदानांवर मात्र आपले फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले; त्यांना तिथे इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे अजिबात जमले नाही. कर्णधार अय्यरने सामन्यानंतर मान्य केले की, क्षेत्ररक्षण हा असा विभाग आहे जिथे आपण पूर्णपणे कमी पडलो. हॅरी ब्रुकसारख्या फलंदाजाचे झेल सोडणे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महागात पडू शकते, याचे उदाहरण या मालिकेत वारंवार दिसले. या मालिकेतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे 'प्लेइंग इलेव्हन'मधील धरसोडवृत्ती. वैभव सूर्यवंशीच्या निवडीवरून मोठा गदारोळ झाला. त्याला आयर्लंडविरुद्ध संधी दिली गेली नाही, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध त्याला अचानक संघात आणले गेले आणि पुन्हा बाहेर काढले गेले. ही पद्धत खेळाडूच्या आत्मविश्वासासाठी घातक ठरते. माजी क्रिकेटपटू हनुमा विहारीने तर थेट गौतम गंभीर यांच्यावर काही ठरावीक खेळाडूंनाच झुकते माप देत आहेत, असे गंभीर आरोप केले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघात जे स्थैर्य होते, ते आता हरवल्याचे चित्र दिसत आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला संक्रमणावस्थेतील संघ असे संबोधले आहे. हे शब्द ऐकायला सोपे वाटत असले तरी, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील २०११ च्या इंग्लंड दौऱ्याची आठवण करून देणारे आहेत. प्रश्न असा आहे की, आपण खरंच संक्रमणावस्थेत आहोत की आपली निवड प्रक्रियाच सदोष आहे? आयपीएलच्या सपाट खेळपट्ट्यांवर खेळून सरावलेल्या खेळाडूंना इंग्लंडमधील उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळताना खूप संघर्ष करावा लागला. हे केवळ तांत्रिक अपयश नसून मानसिकही आहे.(Cricket News)

या मालिकेत भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख खालावलेला दिसला. गोलंदाज बिश्नोईची कामगिरी अत्यंत सुमार राहिली, तर वॉशिंग्टन सुंदरलाही आपल्या फिरकीचा प्रभाव पाडता आला नाही. फलंदाजीत तिलक वर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु त्यालाही धावांचा डोंगर उभा करता आला नाही. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी तर पूर्णपणे दिशाहीन आणि निष्प्रभ ठरली. तसेच, वैभव सूर्यवंशी, सूर्यांश आणि प्रिन्स यादव यांसारख्या युवा खेळाडूंना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. हे खरे आहे की, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या क्षमतेचा ठसा उमटवता आला नाही, मात्र हा त्यांचा शिकण्याचा काळ आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांना सातत्यपूर्ण संधी आणि योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी १९ जुलै रोजी एकदिवसीय मालिका संपल्यानंतर सविस्तर आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. ही आढावा बैठक केवळ नावापुरती नसावी, तर त्यात काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती नक्कीच जाणवत आहे, पण याचा अर्थ आपण नवीन खेळाडू तयार करू शकत नाही, असा होत नाही. भारतीय संघाला अशा अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे जे गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर योगदान देऊ शकतील. क्षेत्ररक्षण, गोलंदाजीची शिस्त, परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघ निवडीतील पारदर्शकता या सर्व आघाड्यांवर भारताला काम करावे लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा