Wednesday, July 15, 2026

Priyanka Chopra : १० वर्षांनंतर उलगडलं गुपित! निक जोनसने प्रियांका चोप्राला पाठवला होता 'हा' पहिला मेसेज आणि मग सुरु झाली...

Priyanka Chopra : १० वर्षांनंतर उलगडलं गुपित! निक जोनसने प्रियांका चोप्राला पाठवला होता 'हा' पहिला मेसेज आणि मग सुरु झाली...

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या ग्लोबल कपलच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली, हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. आता तब्बल दहा वर्षांनंतर निक जोनसने स्वतः या रहस्यावरून पडदा उचलला आहे. नुकतेच 'वाराणसी' चित्रपटाची अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'हे जोनस' (Hey Jonas) या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी निकने त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली आणि त्याने ट्विटरवर प्रियांकाला पहिला 'डायरेक्ट मेसेज' (DM) काय पाठवला होता, याचा स्क्रीनशॉट शेअर करून सर्वांना जुन्या आठवणींच्या सफरीवर नेले.

अशी झाली पहिल्या संवादाची सुरुवात

या पॉडकास्ट दरम्यान निकने जुन्या आठवणींना उजाळा दिला. हॉलिवूडमध्ये प्रियांकाला ओळख मिळवून देणाऱ्या 'क्वांटिको' (Quantico) या सिरीजची माहिती निकला त्याचा भाऊ केविन जोनसने दिली होती. निकने एका ठिकाणी क्वांटिकोचे मोठे होर्डिंग पाहिले होते. घरी आल्यावर केविनने त्याला विचारले की, "तू क्वांटिको सिरीज पाहिली आहेस का?" त्यानंतर निकने थेट ट्विटरवर प्रियांकाला शोधले आणि ती आपल्याला फॉलो करते की नाही हे तपासले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रियांका त्याला आधीपासूनच फॉलो करत होती.

'तो' पहिला मेसेज आणि प्रियांकाचे हुशारीने दिलेले उत्तर

यानंतर निकने प्रियांकाला ट्विटरवर पहिला मेसेज पाठवण्याचे धाडस केले. या ऐतिहासिक मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना निकने सांगितले की, त्याने लिहिले होते- "हॅलो, काही लोकांनी मला सुचवले आहे की आपण एकमेकांना भेटायला हवे. मलाही त्यांचे म्हणणे पटत आहे. तू लवकरच लॉस एंजेलिसमध्ये (LA) येणार आहेस का?" यावर प्रियांकाने अतिशय हुशारीने आणि सावधगिरीने उत्तर दिले. ती म्हणाली, "हे... ग्रॅहमकडून मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे. आपण एकमेकांना मेसेज करूया, कारण माझे ट्विटर अकाउंट माझी टीमही हाताळते." इथूनच त्यांच्या खऱ्या आणि खाजगी संवादाला सुरुवात झाली.

फोटो मागवून केली खात्री, मग सुरू झाले डेटिंग

प्रियांकाने या गप्पांमध्ये आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. पलीकडून बोलणारी व्यक्ती खरोखर प्रियांकाच आहे ना, याची खात्री करण्यासाठी निकने तिला टाईमस्टॅम्प असलेला एक फोटो पाठवण्यास सांगितला. प्रियांकानेही एका फॅशन शोनंतरचा स्वतःचा एक सुंदर फोटो त्याला पाठवला. यानंतर त्यांच्यात मेसेजवर सातत्याने बोलणे सुरू झाले. मात्र, त्यांनी लगेचच डेटिंग सुरू केले नाही. निकने सांगितले की, जवळपास दीड वर्ष एकमेकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने डेट करायला सुरुवात केली, ज्याचे रुपांतर पुढे साखरपुड्यात आणि लग्नबंधनात झाले.

निक जोनसचे बॉलिवूड प्रेम आणि 'गॉसिप'ची आवड

या मुलाखतीतील सर्वात रंजक भाग म्हणजे निकची बॉलिवूड गॉसिप्समधील आवड! प्रियांकाने हसत हसत सांगितले की, तिच्यापेक्षा निककडे बॉलिवूडच्या गॉसिप्सची जास्त माहिती असते. निकनेही कबूल केले की, गेल्या आठ वर्षांत त्याला बॉलिवूडमधील चर्चा आणि बातम्या ऐकण्यात खूप मजा येते. प्रियांका म्हणाली, "कधीकधी मलाच माहीत नसते की बॉलिवूडमध्ये कोणाचे ब्रेकअप झाले आहे, पण निकला सर्व खबर असते. मी एखाद्या मित्राला निरोप द्यायला सांगते, तेव्हा निकच मला थांबवतो आणि सांगतो की 'नको, त्यांचा ब्रेकअप झाला आहे!' मला तर याचा मोठा धक्काच बसतो." निकने हेही उघड केले की तो इन्स्टाग्रामवर काही अकाउंट्स गुपचूप (Ghost-follow) फॉलो करतो, जेणेकरून त्याला बॉलिवूडच्या मसालेदार बातम्या मिळत राहतील.

संस्कृतीचा आदर आणि आगामी प्रोजेक्ट्स

प्रियांकाने निकचे कौतुक करताना सांगितले की, तो भारतीय संस्कृती अतिशय उत्तमरीत्या जपतो. यंदाच्या होळीला प्रियांका शूटिंगसाठी भारतात असताना, निकने तिच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरी मित्रांसाठी खास होळीची पार्टी आयोजित केली होती. त्यातील भारतीय जेवण पाहून प्रियांका खूप भारावून गेली होती.

दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये प्रियांका आणि निकने जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत राजेशाही थाटात लग्नगाठ बांधली होती. जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून 'मालती मेरी' या त्यांच्या मुलीचे स्वागत केले. सध्या प्रियांका एसएस राजामौली यांच्या 'वाराणसी' या बहुचर्चित चित्रपटाच्या तयारीत असून, ती यामध्ये मंदाकिनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय ती 'द ब्लफ' (The Bluff) या ॲक्शन ड्रामामध्येही दिसणार आहे. नुकताच तिचा 'सिटाडेल सीझन २' (Citadel Season 2) देखील प्रदर्शित झाला असून, रिचर्ड मॅडनसोबतची तिची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा