Tuesday, May 12, 2026

'Raja Shivaji' Movie : मराठी प्रेक्षकांकडून ‘राजा शिवाजी’ला भरभरून प्रतिसाद; ११ दिवसांत चित्रपटाने केले ७० कोटी पार

'Raja Shivaji' Movie : मराठी प्रेक्षकांकडून ‘राजा शिवाजी’ला भरभरून प्रतिसाद; ११ दिवसांत चित्रपटाने केले ७० कोटी पार

मुंबई : रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ची (Raja Shivaji) बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजूनही कायम आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत ७० कोटींचा टप्पा पार करत दमदार कामगिरी केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून अभिनेत्री जिनिलिया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक विषय, भव्यदिव्य सेट्स आणि दमदार अभिनयामुळे ‘राजा शिवाजी’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दुसऱ्या सोमवारी किती कमाई?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी २.४० कोटी रुपयांची कमाई केली. विकेंडच्या तुलनेत या कमाईत ६४.७ टक्क्यांची घट झाली असली तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे. सोमवारच्या कमाईनंतर चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ७०.६५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई तब्बल ८३.८० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

हिंदी आणि मराठी या दोन्ही आवृत्त्यांमध्ये चित्रपटाला प्रतिसाद मिळत असला तरी मराठी प्रेक्षकांचा उत्साह अधिक पाहायला मिळत आहे. हिंदी आवृत्तीने ९ टक्के ऑक्युपन्सीसह सुमारे ५० लाख रुपयांची कमाई केली. तर मराठी आवृत्तीने २३ टक्के प्रेक्षक उपस्थितीसह तब्बल १.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ७५ ते १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अवघ्या ११ दिवसांत ७० कोटींपेक्षा अधिक कमाई करत चित्रपट आता बजेट रिकव्हरीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत हा सिनेमा आपले संपूर्ण बजेट वसूल करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम

‘राजा शिवाजी’ने ७० कोटींचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘बाईपण भारी देवा’च्या कमाईला मागे टाकण्याचे लक्ष्य या चित्रपटासमोर आहे.

मराठीतील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट:

  • ‘सैराट’ – ₹९० कोटी
  • ‘बाईपण भारी देवा’ – ₹७६.२८ कोटी
  • ‘राजा शिवाजी’ – ₹७० कोटी+
  • ‘वेड’ – ₹६१.२ कोटी
  • ‘नटसम्राट’ – ₹४२ कोटी

‘राजा शिवाजी’ची सध्या सुरू असलेली बॉक्स ऑफिसवरील हवा पाहता, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे विक्रम आपल्या नावावर करणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >