वेध-सीमा पवार
भारतीय सशस्त्र दलात महिलांचे वाढते योगदान हे देशाच्या बदलत्या सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. महिलांनी केवळ सैन्यात प्रवेश मिळवला नाही, तर आपल्या गुणवत्ता, नेतृत्व, शिस्त आणि कर्तृत्वाच्या बळावर सर्वोच्च जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पेलण्याची क्षमता सिद्ध केली. अशाच प्रेरणादायी प्रवासाची साक्ष देणारी मेजर नव्या शेखावत यांची भारताच्या राष्ट्रपतींच्या सहाय्यक अधिकारी (एडीसी ) म्हणून झालेली नियुक्ती ही महिला सक्षमीकरणाच्या नव्या पर्वाचा अभिमानास्पद टप्पा ठरली आहे.जर नव्या शेखावत यांनी भारतीय लष्कराच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. त्या भारताच्या राष्ट्रपतींच्या सहाय्यक अधिकारी (एडीसी) म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. राष्ट्रपती भवनातील ही प्रतिष्ठेची नियुक्ती भारतीय सशस्त्र दलासाठी एक ऐतिहासिक टप्पा असून, जबाबदारी, सन्मान आणि राष्ट्रीय प्रोटोकॉलच्या महत्त्वाच्या पदांवर महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करणारे गौरवास्पद उदाहरण आहे. सैन्य सेवा दला(आर्मी सर्व्हिस कॉर्प)मधील अधिकारी असलेल्या मेजर नव्या शेखावत या सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भारतीय सैन्यातील या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असल्या तरी यापूर्वी मे २०२५ मध्ये भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी या राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या होत्या. मेजर शेखावत यांचे यश केवळ वैयक्तिक कामगिरी नसून भारतीय सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या योगदानाचे आणि नेतृत्वक्षमतेचे प्रतीक आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गुणवत्ता, व्यावसायिकता आणि नेतृत्व या गुणांच्या आधारे महिलांना सर्वोच्च जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचे स्पष्ट होते. मेजर शेखावत यांचा भारतीय सैन्यातील प्रवास संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) आयोजित संयुक्त संरक्षण सेवा (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस-सीडीएस) परीक्षेद्वारे सुरू झाला. त्यांनी ही अत्यंत स्पर्धात्मक अशी परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी), चेन्नई येथील शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला अ-तांत्रिक (वुमन नॉन टेक्निकल) अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. अधिकारी प्रशिक्षण अकादमी चेन्नई ही भारतीय सैन्याची एक प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था आहे. येथे शारीरिक क्षमता, मानसिक खंबीरपणा, नेतृत्वगुण, शिस्त आणि अधिकारी म्हणून आवश्यक असलेले सर्व गुण विकसित केले जातात. मेजर शेखावत यांनी हे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली.
त्यांना सेना सेवा दल (आर्मी सव्हिर्स कॉर्प)मध्ये नियुक्त करण्यात आले. भारतीय सैन्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची शाखा असून, लष्करासाठी आवश्यक असलेला रसद पुरवठा, वाहतूक व्यवस्था, इंधन, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक सामग्रीचे व्यवस्थापन ही तिची मुख्य जबाबदारी आहे. कोणत्याही लष्करी मोहिमेच्या यशामध्ये प्रभावी रसद व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामध्ये सैन्य सेवा दलाची भूमिका कणा म्हणून ओळखली जाते. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (सीडीएस) परीक्षेत यश मिळवणाऱ्या एका उमेदवारापासून ते भारतीय सैन्यात अधिकारी आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहाय्यक अधिकारीसारख्या प्रतिष्ठित पदापर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास त्यांच्या समर्पण, कौशल्य आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. सेवेत तुलनेने कमी कालावधीत त्यांची या पदासाठी झालेली निवड ही त्यांच्या क्षमतेवर सैन्याने दाखवलेल्या विश्वासाची साक्ष आहे.
राष्ट्रपतीची सहाय्यक अधिकारी हे पद भारतीय सशस्त्र दलांतील अत्यंत प्रतिष्ठेचे आणि मानाचे मानले जाते. सहाय्यक अधिकारी हे राष्ट्रपतींच्या वैयक्तिक कर्मचारीवर्गाचा भाग असतात आणि अधिकृत कार्यक्रम, राष्ट्रीय समारंभ, पदक वितरण सोहळे, राजनैतिक कार्यक्रम तसेच विविध शासकीय समारंभांमध्ये राष्ट्रपतींना सहाय्य करतात. या पदासाठी शिस्त, आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्त्व, उत्तम संवादकौशल्य आणि लष्करी प्रोटोकॉलचे सखोल ज्ञान आवश्यक असते. सहाय्यक अधिकारी हे केवळ आपल्या दलाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानाचे आणि व्यावसायिकतेचे प्रतिनिधित्व करतात. दीर्घकाळ या पदांवर प्रामुख्याने पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती. मात्र २०२५ मध्ये लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांच्या नियुक्तीनंतर महिलांसाठी नवे दालन खुले झाले. त्यानंतर मेजर नव्या शेखावत या भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून या प्रतिष्ठित भूमिकेत विराजमान झाल्या आणि महिलांच्या प्रगतीचा हा प्रवास आणखी मजबूत झाला. राष्ट्रपती भवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींसमवेत उभ्या असलेल्या मेजर शेखावत यांच्या छायाचित्रांनी आणि व्हिडीओंनी देशभरातील तरुणांमध्ये विशेष प्रेरणा निर्माण केली आहे. विशेषतः सैन्यात प्रवेश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणींसाठी त्या 'नारी शक्ती'चे प्रेरणादायी प्रतीक ठरल्यात.
भारतीय सैन्यात महिलांचा प्रवास पाहिला तर १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे प्रवेश देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या आणि संधी सातत्याने वाढत गेल्या. २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांना परमनंट कमिशन देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर महिलांसाठी नेतृत्व, कमांड आणि दीर्घकालीन सेवाकार्यासाठी नवे मार्ग खुले झाले. मेजर नव्या शेखावत यांची नियुक्ती हा या व्यापक बदलाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचा प्रवास हेही सिद्ध करतो की केवळ लढाऊ शाखाच नव्हे, तर रसद आणि सहाय्यक शाखांतील अधिकारीही गुणवत्ता आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतात.
सैन्यातील यश हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून नसून शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्व, आत्मविश्वास, शिस्त आणि चारित्र्य या सर्व गुणांच्या एकत्रित विकासावर आधारित असते. त्यांची नियुक्ती भारतीय सैन्याच्या मूलभूत मूल्यांची कर्तव्य, सन्मान आणि सेवा पुन्हा एकदा प्रचिती देते. गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर महिलांना उच्च जबाबदाऱ्या देऊन भारतीय सैन्याने नेतृत्व हे लिंगावर नव्हे तर गुणवत्तेवर अवलंबून असते, हा भक्कम संदेश दिला. राष्ट्रपती भवनात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या असंख्य भारतीय युवक-युवतींसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांचा प्रवास शिस्त, चिकाटी, व्यावसायिकता आणि निःस्वार्थ सेवाभाव यांचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय सैन्याची वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी मेजर नव्या शेखावत यांची कथा एक महत्त्वाचा संदेश देते - समर्पण, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या बळावर इतिहास घडवता येतो. जो महिलेच्या यशाचा नाही, तर तिच्या जिद्दीचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वगुणांचा गौरव करणारा आहे.






