मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा – इगतपुरी – खर्डी विभागामध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी १०, ११ मे रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, सीएसएमटी – कसारा थेट लोकल सेवा बंद असेल. तसेच मेल-एक्स्प्रेस वाहतुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १० आणि ११ मे रोजी दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत इगतपुरी – खर्डी दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कसारा मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
लोकल सेवांवर परिणाम : सीएसएमटीवरून कसाऱ्याकडे जाणाऱ्या काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून अनुक्रमे दुपारी १.१०, २.१७ आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच चालवण्यात येतील. सीएसएमटीवरून १:१०, २:१७ आणि २:४६ वाजता सुटणाऱ्या लोकल आसनगावपर्यंतच चालतील. तसेच, कसारा ते सीएसएमटी दुपारी ३:३५, ४:१६ आणि ५:०२ च्या गाड्या आसनगावहून सुटतील. मेल/एक्स्प्रेस गाड्या: कामायनी, राजधानी, राजगीर, सेवाग्राम, सुलतानपूर आणि गोरखपूर एक्स्प्रेस यांसारख्या प्रमुख गाड्या खर्डी, आटगाव, खडवली आणि टिटवाळा स्थानकांवर काही काळासाठी थांबवण्यात येतील. प्रवाशांनी या ब्लॉकची नोंद घ्यावी आणि अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा यात्री अॅपला भेट द्यावी.
पनवेल-मडगांव दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या : उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वेमार्गावर वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने मडगाव जंक्शन–पनवेल दरम्यान साप्ताहिक उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११०६ मडगाव जं.–पनवेल विशेष रविवार, १० मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११०५ पनवेल–मडगाव विशेष सोमवार, ११ मे रोजी सकाळी ५.४५ वाजता पनवेलहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण येथे थांबणार आहे. गाडीत वातानुकूलित त्रिस्तरीय ३, शयनयान ११, सामान्य ७ आणि एसएलआरचे २ असे एकूण २३ डबे असतील.






