फेरफटका : सीमा मालाणी
आम्ही लहान असताना आमची मोठी भावंडे कॉलेजात होती. त्यावेळी घरोघरी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात अनेक माणसांमध्ये एक महत्त्वाची व्यक्तिरेखा असायची. ती बोलायची, घरातले सर्व लोक तिला चालवायचे, तिने फारच नाठाळपणा केला तर थपडा मारायचे, कधी तिचा एकच असलेला कान ओढायचे, कधीकधी प्रेमाने तिला पांघरूणात घेऊन झोपायचे. घरातील प्रत्येक भागात म्हणजे बैठकीत, माजघरात, स्वयंपाकघरात, झोपायच्या खोलीत, गच्चीवर, गॅलरीत इतकंच नव्हे तर संडासात देखील लोक तिला घेऊन जायचे इतकी ती महत्त्वाची होती. कधी कधी तिच्याभोवती कोंडाळं करून माणसं तिला गुदमरून टाकत असत. भारताचे पाकिस्तान, बांगलादेश, चीन वगैरे देशांबरोबर युद्ध चालू असताना तर लोक फारच गंभीरपणे व शांतपणे तिला कान देऊन ऐकायचे. मी कशाबद्दल बोलत आहे, एव्हाना तुम्हाला कळलेच असेल. रेडिओ.
वाट्टेल त्या साईजचा हा रेडिओ घराघरात तिन्ही त्रिकाळ बडबडत किंवा वाजत असायचा. त्यावर कोणतेही स्टेशन लावायला गेलो की त्यातील बाई किंवा बाप्या, प्रथम तुम्ही किती मेगाहर्टझ् वरून हे ऐकताय हे सांगत. या मेगाहर्टझने नक्की काय मोजतात हे मला अजून कळलेले नाही. कुठलीही खरखर न होता गाणे ऐकायला येणे ही दुर्मिळ गोष्ट असे. लताबाईंना किंवा रफीसाहेबांना सर्दी- खोकला झाल्याचे रेडिओ वारंवार सिद्ध करी. तरीसुद्धा भूले बिसरे गीत, बिनाका गीतमाला, बेला के फूल यासारख्या कार्यक्रमांना रसिक उदंड प्रतिसाद देत. रेडिओला गाण्यांच्या फर्माईशी पाठवत. पाठविणाऱ्या लोकांच्या नावांची व गावांची यादी वाचताना ती व्यक्ती अजिबात कंटाळवाणी वाटत नसे. यामध्ये 'झुमरीतलैया' या गावातील लोक, दिवसभर कामधंदे, जेवणखाण सोडून फर्माईशीच पाठवतात की काय इतक्या वेळा ते नाव रेडिओवर येत असे.
दुपारी माजघरात रेडिओवर 'वनिता मंडळ' लावून घरातल्या थकलेल्या आयाबाया गुडूप झोपी जात. म्हातारे आजोबा मात्र दिवसभर बातम्या ऐकून देशभरच्या राजकारणाची खडानखडा माहिती करून घेत. जणूकाही त्यांच्या नुसत्या ऐकण्याने राजकारणाची दिशा बदलणार आहे. 'कामगार सभा' या कार्यक्रमाची ट्यून चालू झाली की लोकं आपापली घड्याळे लावून घेत.
तरुण पोरापोरींची रात्री रेडिओवरून घरात खडाजंगी होणे ही एक सहज घटना असे. टेप-रेकॉर्डर जोपर्यंत आले नव्हते तोपर्यंत रेडिओवर लागणाऱ्या हिंदी-मराठी गीतांचे शब्द लिहिण्याचा म्हणजे गायक- गायिका गात असतानाच एकीकडे वहीत भराभर बोल टिपण्याचा परिपाठ घराघरात होता. काही शब्दांच्या रिकाम्या जागा सोडून, नंतर त्या एकमेकांना विचारून, अभ्यास पूर्ण केला जायचा. क्रिकेट मॅचच्या दिवसात रेडिओचा ताबा पूर्ण तरुण मुलांकडे असायचा. ही मुले गच्चीवर जाऊन, रेडिओ कानाला लावून, एकमेकांना हातवारे करून स्कोअर सांगायची व पूर्ण गल्ली दणाणून जायची.
रेडिओवर बाकी काहीच न लागता फक्त 'रघुपति राघव... किंवा वैष्णव जन तो... लागले की देशातील कुणीतरी मातब्बर व्यक्ती दगावल्याचे लगेच कळे. शाळा-कॉलेज, ऑफिसेसना सुट्टी मिळेल की काय या आशेने लोक मनातून आनंदी होत. पण घरातील रेडिओवरचा गाण्यांचा रतीब बंद झाल्याने खट्टूही होत.
टीव्ही आल्यावर हे चित्र पालटले. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असताना गच्चीवर जाऊन अँटिना हलवून परत खाली येऊन पडद्यावरच्या काळ्या- पांढऱ्या मुंग्या पहायला लोक सरावले तोच रंगीत टीव्ही आला. छायागीत, सिनेमा, किंवा गजरा यासारखे लोकप्रिय कार्यक्रम पाहायला लोक एकमेकांकडे हक्काने जाऊ लागले. जणू काही सत्संग केल्याप्रमाणे आनंदीत होऊ लागले.
आमच्याकडे आमचे आजोबा, वय वर्षे , टीव्हीवर सकाळ व संध्याकाळच्या बातम्या न चुकता बघत. त्यावेळी ते टीव्हीसमोर दोन फुटांवर ऐसपैस खुर्चीत बसून मोठ्या आवाजात बातम्या बघत. इतरांना पडद्यावरचे काहीच दिसत नसे. अशावेळी आजीही शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडे जाऊन, गप्पा ठोकून गावभरच्या 'बातम्या' गोळा करून आणायची.
रामानंद सागरचे 'रामायण' चालू झाल्यावर तर विचारूच नका इतकी शेजाऱ्यांची घरातील मंडळी बडदास्त ठेवीत. ज्यांच्याकडे गल्लीत रंगीत टीव्ही नव्हते ती सर्व मंडळी येत. घरातील लोक टीव्हीसमोर उदबत्ती लावून ठेवत. एका भांड्यात खडीसाखर किंवा खिरापत असा प्रसाद असे. सतरंज्या, जाजमं व्यवस्थित जमिनीवर अंथरून जो तो आपापल्या जागेवर स्थानापन्न होई. त्यावेळी रस्त्यावर चिटपाखरूही नसे. आमच्या काकांनी, युद्धात रामाचा विजय झाल्यावर टीव्हीला हार घालून पेढे वाटल्याचे मला चांगलेच आठवते.
पुढे बी.आर. चोप्रांचे 'महाभारत' टीव्हीवर आले. त्यावेळी मात्र लोक इतके भावुक झाले नाहीत. पण ते महाभारत जबरदस्त लोकप्रिय झाले. स्वतःच्या घरातील तत्कालीन 'महाभारत' विसरून लोक महाभारत पाहायचे. 'यदा यदा ही धर्मस्य .....सुरू झाले की सगळ्या रस्त्यांवर एकदम शांतता पसरे. या काळात अनेक भुरट्या चोरांनी त्यांचा 'धर्म' प्रामाणिकपणे निभावला.
सध्याच्या टीव्ही संस्कृतीवर न बोललेलेच बरे. 'घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं' अशीच परिस्थिती आहे. ते घोडं प्रत्येकजण आपल्या खिशात घेऊनच फिरतंय. त्या छोटुश्या रंगीत, तेजस्वी चौकोनाने सर्व लोक शहाणे की अतिशहाणे झालेत हे मात्र समजत नाही.






