मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या आता कमी होत असून ४९६ ठिकाणांपैंकी आतापर्यंत ४०३ ठिकाणांवरील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यात आली आहे. याठिकाणी आता पाणी साचणार नसून ९३ ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गती होऊन जे पाणी साचले जाते, त्यातील १३ ठिकाणांवरील पाणी साचण्याची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे जे उर्वरीत जी काही ठिकाणे आहे, त्यासर्व ठिकाणी ५४७ पंप बसवले जाणार आहेत. हे सर्व पंप १ मेपासून कार्यान्वित होतील. यातील प्रत्येक पंप त्या ठिकाणी असलेल्या पंप चालकांना दिलेल्या मोबाईल फोनचे त्या ठिकाणाशी जीओ फेनसिंग करण्यात येईल.
मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना आश्विनी भिडे यांनी यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव असून अचुक अंदाज मे महिन्यात येईल. मात्र, मान्सून कधीही येवू शकतो, त्यामुळे मान्सूनबाबत पूर्ण तयारी केली जात आहे. मुंबईत आजवर ४९६ पूरप्रवण ठिकाणे होती, त्यातील ४०३ ठिकाणांवरील कामे पूर्ण झाली आहेत. तर ९३ ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणे होती, त्यातीलही १३ ठिकाणांवरील कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यासर्व ठिकाणी ५४७ पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती आश्विनी भिडे यांनी दिली.
या बैठकीमध्ये पाणी साचण्याच्या ठिकाणांच्या निर्मितीमागची कारणे तपासणे आणि पाण्याचा निचरा होणारे मार्ग स्वच्छ करून त्यात कोणताही अडथळा उद्भवणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे व वेळोवेळी करण्यात येत आहे. तसेच स्थानिक पातळीवर पाणी उपसा पंपासह २४ x ७ मनुष्यबळ १५ मे २०२६ पासून उपलब्ध असेल. पंप चालकांसमवेत समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्षात पंप चालक प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक पंप चालक 'स्मार्ट फोन'द्वारे संबंधित ठिकाणाचे छायाचित्र नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देईल. प्रत्येक पंप ठिकाणी पंप चालकांना दिलेल्या मोबाईल फोनचे त्या ठिकाणाशी Geo-fencing करण्यात येईल.
विशेष म्हणजे पाणी साचलेल्या ठिकाणी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी १० फिरती डीवॉटरिंग पंप असणारी वाहने तैनात करण्यात येणार आहेत. आणि प्रत्येक परिमंडळ उप आयुक्तांच्या कार्यालयात म्हणजेच७ परिमंडळ कार्यालयात प्रत्येकी एक वाहन उपलब्ध असेल.
याशिवाय, पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या कार्यालयांमध्ये शहर क्षेत्रासाठी उपप्रमुख अभियंता (प्रचलन व परिरक्षण), पश्चिम उपनगरांसाठी उपप्रमुख अभियंता (प्रचलन व परिरक्षण) आणि पूर्व उपनगरांसाठी उपप्रमुख अभियंता (प्रचलन व परिरक्षण) यांच्या कार्यालयात प्रत्येक एक वाहन उपलब्ध असेल. मेट्रो रेल्वेच्या आवश्यकतेनुसार मरोळ नाका, शीतलादेवी, वरळी नाका आणि महालक्ष्मी येथे 'डीवॉटरिंग पंप' उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, माटुंगा, भांडूप, चुनाभट्टी आणि दादर येथेही डीवॉटरिंग पंप बसविण्यात येतील. मेट्रो रेल्वेच्या विनंतीनुसार याठिकाणी पंपांची व्यवस्था करण्यात येणार आहे.






