Sunday, April 12, 2026

स्वर नभांगणातील लखलखता तारा निखळला...

स्वर नभांगणातील लखलखता तारा निखळला...

स्वरसम्राज्ञी, स्वरमोहिनी, स्वररागिणी की स्वरसंमोहिनी? कोणत्या नावाने तुज उद्गारावे, स्वर आशेचे कोणत्या नभातून बरसावे?

महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतीयांच्या हृदयातील सूरनक्षत्र—गझल, भक्तीभावगीत, कॅब्रे-सीनेगीत, नाट्यगीत, बालगीत, लावणी वा बंदिश! कशी वर्णावी थोरवी यांची? सारेच ‘भाव’ गीताचे केले यांनी पवित्र. मंगेशकरी पंचस्वरातील अखंड झळाळणारे हे सूरनक्षत्र!

आपल्या मधाळ आवाजाने गेली आठ दशके रसिकहृदयावर राज्य करणाऱ्या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणजे आशा भोसले—आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांचा जन्म १९३३ साली संगीतसूर्य मास्टर दीनानाथ आणि शुद्धमती मंगेशकर यांच्या पोटी झाला. लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या पंचरत्नांपैकी एक रत्न म्हणजे आशा भोसले.

या पाचही भावंडांनी अल्पवयातच गायन कारकीर्द सुरू केली. अवघ्या दहाव्या वर्षी ‘चुनरिया’ या चित्रपटासाठी हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन करून आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परिश्रमाची तयारी, जिद्द आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी हिंदुस्तानी अभिजात संगीतात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.

ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन आणि सुधीर फडके या संगीतकारांसोबत त्यांची कारकीर्द गाजली व स्थिरावली. त्यांचे लहान भाऊ बाळासाहेब म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गीते आशाताईंच्या जीवनातील अजरामर ठरली. ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ गाणाऱ्या आशाताईंनी जगातील कोणते संगीत गायले नाही? जीवनातले कोणते दुःख सहन केले नाही? दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच—सगळी दुःखे पचवून त्या सगळे काही गायल्या आणि संगीतजगतातील सर्वोच्च ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळवून भारतातच नव्हे, तर जगात लोकप्रिय गायिका ठरल्या.

भोगले जे दुःख, ज्याला सुख म्हणावे लागले,

एवढे मी भोगले की मज हसावे लागले. सुरेश भटांनी लिहिलेल्या या दोन ओळी आशाताईंची संपूर्ण जीवनकहाणी सांगतात. कोणी म्हणते वीस हजार, कोणी म्हणते तीस हजार—जन्माला आल्यापासून आतापर्यंत जितके दिवस त्या जगल्या, तितकी गीते त्यांनी गायली! त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत घडलेले सारे काही कथा-कादंबरीतील कल्पनारम्य चमत्कारासारखे भासते. सारी कटू सत्ये पचवून स्वरतेजाची झळाळी घेऊन त्या अखंड तळपत राहिल्या. आपल्या मराठी वा हिंदी लोकप्रिय संगीतासोबत त्यांनी रवींद्रसंगीत, नजरुल गीते, लोकगीते, पॉप असे सर्व प्रकार गाऊनही पुन्हा पुन्हा मराठीवर प्रेम करत मराठीच बनून राहिल्या. आवाजातून अभिनय करता येतो, हे त्यांनी चित्रपटसृष्टीला शिकवले. उत्कटता, मार्दवता, आर्जवता, रौद्रता, सात्त्विकता, अट्टाहास—अशा सर्व भावना साभिनय गाण्यातून व्यक्त करणाऱ्या एकमेव द्वितीया म्हणजे आशाताई!

रेडिओच्या जमान्यापासून मोबाईलच्या जमान्यापर्यंत सर्व माध्यमांतून स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवून रसिकप्रिय ठरणाऱ्या आशाताईंनी आठ दशके संगीतसेवा केली. ‘नाच रे मोरा’, ‘चंदाराणी’, ‘एक झोका’ अशा बालगीतांतून बालभाव व्यक्त करणाऱ्या आशाताई, जेव्हा जिवलगाचा आर्त सूर लावतात तेव्हा विरहिणी होतात; ‘उषःकाल होता होता’ गातात तेव्हा क्रांतिकारी भासतात; ‘दिन तैशी रजनी’ गातात तेव्हा संतत्व ल्यालेली ज्ञानदेव माऊली भासतात; आणि ‘रुपेरी वाळूत’ गातात तेव्हा मादक प्रेयसीचा स्वर अविष्कार होतो. ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल फक्त आशाताईंसाठीच संगीतबद्ध केली आहे असे वाटते—इतके चढ-उतार, ताना आणि संथ ठहराव असलेली सुरावट बाळासाहेबांनी म्हणजेच पं. हृदयनाथांनी रचलेली आहे.

त्यांचे वडील संगीतसूर्य मास्टर दीनानाथांची ‘प्रेम सेवा शरण’, ‘युवती मना दारुण’, ‘विलोपले’, ‘शूरा मी वंदिले’, ‘रवी मी’ अशी नाट्यगीते गाऊन त्यांनी वडिलांच्या गायकीची ही ‘मर्मबंधातली ठेव’ जगाला दाखवून दिली. पं. भीमसेन जोशींसोबतचे ‘रस बरसन अमृत वीणा’ (जोग रागावर आधारित) असो, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासोबतचे ‘ही कुणी छेडिली तार’ असो, गझलनवाज उस्ताद गुलाम अलींसोबत गायिलेल्या ‘मिराज-ए-गजल’मधील अनवट गझला असोत, अथवा उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोद वादनासह सादर केलेल्या तानसेनांच्या पारंपरिक बंदिशी—हे सर्व अचंबित करणारे आहे.

लहानपणीची हट्टी, लढवय्या मुलगी; सहनशील पत्नी; अखंड ममत्वाचा झरा असलेली आई; बाणेदार, स्वाभिमानी मराठी स्त्री; खंबीर, हुशार, चतुर आणि दूरदृष्टी असलेली व्यावसायिक; तसेच कुटुंबावर—विशेषतः आपल्या लहान भावावर म्हणजेच बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारी बहीण—म्हणजे आशाताई. सर्वगुणसंपन्न, सामान्य लोकांना सातत्याने असामान्यत्वाचा परीसस्पर्श देणारी, नेणीवेपलीकडचे आयुष्य जगणारी, अंतर्बाह्य दैवत्व लाभलेली सत्शील व्यक्ती म्हणजे आशाताई.

चहुकडे पसरलेल्या सागरातील कोणती लाट हातात मावेल किंवा नजरेत ठरेल? जसे हे अशक्य, तसे त्यांच्या गाण्यांची संपूर्ण दखल एका लेखात घेणे अशक्य आहे. इतके प्रचंड त्यांनी गाऊन आपल्या संस्कृतीला अलौकिक केले आहे. सज्जाद, नौशाद, ओ. पी. नय्यर, खय्याम, आर. डी. बर्मन अशा जुन्या संगीतकारांपासून अलीकडील युवा संगीतकारांपर्यंत असंख्य कलाकारांसाठी त्या अविरत गात राहिल्या.

‘दिल चीज क्या है’ हे गीत त्यांच्या तोंडून ऐकताना त्याचे संगीतकार खय्यामजीसुद्धा भारावून जात असत—तर सर्वसामान्य रसिकांची अवस्था काय असेल!

हिंदी चित्रपटसृष्टीतील कॅब्रे गीतांना आशाताईंचा स्वर लाभणे आणि हेलनसारख्या नर्तिकेच्या आयुष्याला सोन्याचा स्पर्श मिळणे म्हणजे जणू एखाद्या सौभाग्यवतीने पैठणी परिधान करण्याइतके सुंदर आहे. ‘उमराव जान’ चित्रपटातील ठुमरी अंगाने गायलेल्या गझलांनी रेखा या अभिनेत्रीची प्रतिमा बदलून टाकली. नलिनी जयवंत, मधुबाला, नूतन, तनुजा अशा शेकडो अभिनेत्रींना आवाज देत वयाच्या ८७व्या वर्षी ‘माई’ या चित्रपटात स्वतः अभिनेत्रीही बनल्या. त्यांचा जीवनप्रवास जगातील सर्वांसाठी—विशेषतः नवपिढीसाठी—प्रेरणादायी आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं’—असे संसारासाठी, मुलाबाळांसाठी आयुष्यभर गायले, असे त्या सांगतात. कित्येक हसरी, रोमँटिक गाणी त्यांनी रडत-रडत गायली; पण स्वरांत दुःख दाखवले नाही—गीताचा भाव जपला. वैयक्तिक खडतर आयुष्य सांभाळत त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक आयुष्यातील उलाढाली थक्क करणाऱ्या आहेत.

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’— हे आयुष्यभर गाणाऱ्या आशाताई आज देवाकडे गेल्या... त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती.

विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश) कवयित्री, गायिका

Comments
Add Comment