Friday, June 12, 2026

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या लाईव्ह शो मध्ये केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी सेजल पवार हिने केलेल्या घृणास्पद वक्तव्य प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली कोणतेही बीभत्स प्रकार, घृणास्पद वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली असून, कलाकार आणि आशय निर्मात्यांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील ज्या दोन क्लिप्स समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत, त्यावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पहिल्या क्लिपमध्ये हिमांशू जागडा नामक एका व्यक्तीने एका महिलेसोबत केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाची घटना सांगितली, तर दुसऱ्या क्लिपमध्ये केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान केलेल्या पुरुषांच्या मृतदेहाविषयी अत्यंत घृणास्पद, अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. या दोन्ही वेळी कॉमेडियन प्रणितने आक्षेप घेण्याऐवजी हसून दाद दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही क्लिप्समधील असंवेदनशीलतेची दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट करताना आणि कायदेशीर कारवाईचे पूर्ण समर्थन करताना स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई केली. तसेच, केईएम रुग्णालय प्रशासनाने देखील सेजल पवार हिची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, मात्र त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली महिलांचा अवमान, अश्लीलता, घृणास्पद वक्तव्ये, बीभत्स प्रकार किंवा समाजात चुकीचा संदेश देणारा कंटेंट कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही. महिलांविषयी, संमतीविषयी आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संवेदनशील विषयांवर सार्वजनिक मंचावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा पाळल्या पाहिजेत. युवकांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असल्याने अशा कंटेंटचा समाजावर होणारा परिणाम गंभीरपणे विचारात घेतला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असले पाहिजे. सर्व कलाकार, डिजिटल कंटेंट निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी आपली सर्जनशीलता जपताना समाजहित, संवेदनशीलता आणि नैतिकतेचे भान राखले पाहिजे. नागरिकांनाही सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे तसेच द्वेष, अश्लीलता आणि महिलांविरोधी मानसिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींना कडाडून विरोध केला पाहिजे, असेही महापौर रितू तावडे यांनी या निमित्ताने आवाहन केले आहे. दरम्यान आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनीही शासन, सामाजिक संस्था आणि विविध यंत्रणांकडून अवयवदानाबाबत जनजागृती केली जात असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे वर्णन होणे खेदजनक असल्याचे नमुद करत त्यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आल्याचीही माहिती दिली.

Comments
Add Comment