Saturday, March 21, 2026

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

शनिवारी सकाळी ६ ते सुमारे ११.३० वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. या काळात गोळीबार मैदान आणि आसपासच्या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून बाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सोलापूर रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या जड वाहनांना भैरोबा नाला चौकातून वानवडी आणि लुल्लानगरमार्गे वळवण्यात येणार आहे. तर शहरात येणाऱ्या किंवा स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी भैरोबा नाला, एम्प्रेस गार्डन आणि घोरपडी या मार्गांचा वापर करण्याचा पोलिसांनी निर्देश दिले आहेत.

मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान हा रस्ताही या कालावधीत बंद राहणार आहे.

स्वारगेटकडून हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी सात लव्हज चौकातून गुलटेकडी आणि सॅलिसबरी पार्कमार्गे पर्यायी मार्ग निवडावा. लष्कर भागात सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूकही वळवण्यात आली असून खटाव बंगला चौकातून नेपियर रस्ता किंवा बिशप स्कूल मार्गाचा वापर करावा.

सणाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत व्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment