महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे
भारतात गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती यांसारख्या अनेक पवित्र नद्या आहेत. ज्यांच्या स्नानाने मानव पापमुक्त होतो, अशी हिंदू धर्मात धारणा आहे. मात्र नर्मदा ही अशी एक नदी आहे की तिच्या केवळ दर्शनानेच मानव पापमुक्त होतो, असा उल्लेख स्कंध पुराणात आहे. या नदीच्या तीरावर अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केल्या. तिच्या काठावर अनेक मंदिरे , तीर्थक्षेत्रे व संतांचे आश्रम आहेत. यामुळे नर्मदेला प्रदक्षिणा केल्याने अगणित पुण्य लाभते. तसेच तिच्या काठावर केलेल्या पुण्यकर्माचे पुण्य अधिकाधिक पटीने मिळते अशी धारणा आहे.
नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा ज्या ठिकाणी उगम पावते तेथून ती सागराला मिळते तेथपर्यंत एका तिराने जाऊन नंतर बोटीने दुसऱ्या तीरावर जाऊन त्या तीरावरून तिच्या उगमापर्यंत येणे याला नर्मदेची प्रदक्षिणा म्हणतात.नर्मदा मध्य प्रदेशातील अनापूर जिल्ह्यातील अमरकंटक येथील पठारातून उगम पाहून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मार्गे ती खंबाताच्या आखातात समुद्राला मिळते. हा पूर्ण मार्ग अंदाजे १३१२ किलोमीटर आहे. त्यामुळे पूर्ण प्रदक्षिणेचा मार्ग अंदाजे २६०० किमी.चे वर आहे. त्यातही काठावरील धार्मिक स्थळांचे स्थान परत्वे अंतर व प्रदक्षिणा लक्षात घेतल्यास हे अंतर ३००० ते ३५०० किमीच्या आसपास जावू शकते.ऑक्टोबर ते मार्च ही वेळ साधारणत: परिक्रमेसाठी योग्य मानली जाते. नर्मदा परिक्रमेला तिच्या काठावरून कोठूनही सुरुवात केली तरी चालते; परंतु सहसा अमरकंटक, ओंकारेश्वर अथवा नेमावरपासून संकल्प करून परिक्रमेला सुरुवात करतात. नेमावरपासून दोन्ही तिराचे अंतर साधारणतः समान असल्याने नेमावरला नाभी असेही म्हणतात. परिक्रमेचे नियम
नर्मदा ही कुमारी कन्या आहे. त्याच्यामुळे तिची प्रदक्षिणा ही एक तप मानले जाते. त्यामुळे हे तप करताना काही नियम पाळले जातात. जसे, प्रदक्षिणेदरम्यान नर्मदा नेहमी उजवीकडे असावी, तसेच तिचे पात्र ओलांडता येत नाही, मात्र तिला येऊन मिळणारे पाणी ओलांडले तरी चालते. प्रदक्षिणे दरम्यान कुठेही वादविवाद करू नये. वर्तन सात्त्विक असावे. हिंसा करू नये. सत्यवादी असावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे, धार्मिक चर्चे व्यतिरिक्त अन्य विषयावर बोलू नये. आहार सात्त्विक असावा. परिक्रमेदरम्यान ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असेल त्याच ठिकाणी सात्त्विक भोजन करावे. काही ठिकाणी सुविधा नसल्यास पाच घरी भिक्षा मागून अन्न सेवन करावे. भिक्षा मागण्याने अहंकाराचा नाश होतो. तसेच परिक्रमे दरम्यान मौन पाळावे अथवा नेहमी “नर्मदे हर” असा घोष करावा. परिक्रमे दरम्यान लोकही सहकार्याच्या भावनेने परिक्रमा करणाऱ्यांची सेवा करतात व त्यांच्या निवास व भोजनाची आपल्यापरीने व्यवस्था करतात. म्हणून गमतीने नर्मदा परिक्रमे दरम्यान आटा (पीठ), काटा (जळाऊ काटक्या) व भाटा (दगड) यांची कमतरता भासत नाही असे म्हणतात.
परिक्रमेचे प्रकार व कालावधी
मार्कंडेय ऋषींना परिक्रमेचे मूळ प्रवर्तक मानले जाते. सर्वप्रथम मार्कंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमा केली. त्या परिक्रमे दरम्यान त्यांनी केवळ नर्मदाच नव्हे तर तिच्या दोन्ही तीरावर तिला येऊन मिळणाऱ्या सर्व नद्यांचे प्रवाह न ओलांडता त्यांच्याही उगमाला वळसा घालून परिक्रमा केली. यासाठी त्यांना ४५ वर्षे लागली असे म्हणतात.पारंपरिक पायी परिक्रमा परिक्रमेचे नियम पाळून व सकाळ, संध्याकाळ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान व संध्या वंदन करून ही परिक्रमा करतात. याला साधारणत: ३ वर्षे ३ महिने व १३ दिवस लागतात असे प्राचीन परंपरेत सांगितले आहे.काही भक्तगण पायी जलद प्रवास करून ही परिक्रमा एक ते दोन वर्षांत पूर्ण करतात.
वाहनाद्वारे
वाहनाद्वारे आज मीतीस ही परिक्रमा १५ ते ३० दिवसांत करण्यात येते. नर्मदेच्या दर्शनानेही पापक्षालन होते. जलहरी परिक्रमा या परिक्रमेत दोन्ही तीरांची स्वतंत्र परिक्रमा केली जाते. एका तीरांवर उगमापासून सागरापर्यंत जाऊन परत त्याच तीरावरून पुन्हा मुखापर्यंत परत येणे व नंतर दुसऱ्या तीरावर नदीच्या उगमापासून सागरापर्यंत जाऊन पुन्हा उगमाचे ठिकाणी परत येणे अशा परिक्रमेला जलहारी परिक्रमा म्हणतात. अशा प्रकारचीही परिक्रमा काही जण करतात.
दंडवत परिक्रमा
जमिनीवर प्रत्येक दिवशी १००० साष्टांग नमस्कार करून ही परिक्रमा करतात. त्याला दंडवत प्ररिक्रमा म्हणतात; परंतु खडबडीत जागा, पहाडाची जागा, चढ, उतार, अशा ठिकाणी ही परिक्रमा संभवित नाही.
खंड परिक्रमा
एकाच वेळी पूर्ण परिक्रमा न करू शकणारे टप्प्याटप्प्याने ही परिक्रमा पूर्ण करतात. दरवेळेस काही अंतर चालून पुढे खंड पडून पुढच्या वेळेस जेथे खंड पडला त्याच ठिकाणापासून पुढे परिक्रमेस सुरुवात करतात. नोकरी, व्यवसाय किंवा आरोग्य अशा विविध कारणांमुळे एकाच वेळी परिक्रमा पूर्ण न करू शकणारे इच्छूक अथवा भक्तगण ही परिक्रमा करतात. कोणत्याही परिक्रमेस लागणारा कालावधी हा ती परिक्रमा करणाऱ्या भक्ताचे किंवा इच्छुकाचे वय, आरोग्य, आजारपण, त्यावेळचे वातावरण आदी सर्व घटकांवर अवलंबून असतो.
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
गुजरातमधील रामापूर ते तिलकवाडा यादरम्यान नर्मदेचा प्रवाह उत्तर दिशेने असतो व पुढे तो पूर्ववत पश्चिमेकडे होतो. या दरम्यानच्या तिरावरही अनेक संतांचे आश्रम व मंदिरे आहेत. त्यामुळे ज्यांना पूर्ण नर्मदेची प्रदक्षिणा करणे शक्य होत नाही ते या रामापूर ते तिलकवाडा दरम्यान नर्मदेची प्रदक्षिणा करतात. या दरम्यानच्या प्रदक्षिणेला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. हे अंतर पायी अंदाजे २१ किलोमीटर आहे. ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात केली जाते व ही करणाऱ्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य मिळते असे स्कंद पुराणात सांगितले आहे.नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान केव्हाही, कुठेही, अथवा शेवटी कन्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे कोणी संकल्पाचे वेळी अथवा परिक्रमे दरम्यान अथवा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कन्या पूजन करतात. नर्मदा परिक्रमेंने मनाची शुद्धता होते. अहंकार नष्ट होऊन ईश्वर प्रति समर्पण भाव निर्माण होतो. तसेच परिक्रमेदरम्यान कोणत्या तरी रूपात नर्मदेचे दर्शन होते अशी भक्तगणांची प्रबळ भावना आहे.






