Saturday, July 11, 2026

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपो दुर्घटनेची मोठी अपडेट : तब्बल ७६ तासांनंतर ढिगाऱ्याखाली ४ जण आढळले!

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपो दुर्घटनेची मोठी अपडेट : तब्बल ७६ तासांनंतर ढिगाऱ्याखाली ४ जण आढळले!

पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथील मोशी (Moshi) कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या भीषण दुर्घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. मागील चार दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवांसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. जसजसा वेळ जात होता तसतशी जगण्याची आशा मावळत चालली होती; पण आज, चौथ्या दिवशी एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला. सलग सुरू असलेल्या या शोधमोहिमेत आज तब्बल ४ कामगारांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तातडीने या चारही बचावलेल्या कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ढिगाऱ्याखाली एकूण ८ जण अडकल्याची भीती होती, त्यापैकी आता केवळ एका कामगाराचा शोध बाकी असून लवकरच ही बचाव मोहीम पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

८ जुलैला ओढवला होता अनर्थ; कुटुंबीयांचा फुटला संयमाचा बांध

८ जुलै २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास हाहाकार उडाला, जेव्हा 'वेस्ट-टू-एनर्जी' (Waste-to-Energy) प्रकल्पाची ही तीन मजली प्रशासकीय इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीखाली अनेक कामगार अडकले होते. सुरुवातीच्या टप्प्यात १४ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यानंतरचे तास अत्यंत तणावपूर्ण होते. आज चौथ्या दिवशी घटनास्थळी अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला होता. आज सकाळी आणखी एका मजुराचा मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या दोनवर पोहोचली. मात्र संध्याकाळच्या सुमारास बचावकार्याला मोठी गती मिळाली आणि ढिगाऱ्याखालून एकूण ५ जणांना बाहेर काढण्यात आले.

४ जणांना जीवदान, पण अक्षय सावंतचा दुर्दैवी अंत

११ जुलैच्या या शोधमोहिमेत बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी), सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि नागेश गायकवाड (वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी) या चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना पिंपरी येथील वायसीएम (YCM) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे या ५ जणांमध्ये बाहेर काढण्यात आलेला तरुण अक्षय सावंत याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून घटनास्थळाची पाहणी व चौकशीचे आदेश

या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात साचलेला विषारी वायू आणि सततचा पाऊस यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. अद्याप बेपत्ता असलेल्या कामगाराचा शोध सुरू असून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीअंती जे सत्य समोर येईल, त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल."

शासन, प्रशासन आणि कंपनीकडून मदतीचे आश्वासन

हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने मृतदेह थेट नातेवाईकांना दाखवण्याच्या सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. "महाराष्ट्र शासन, महापालिका आणि संबंधित कंपनीच्या माध्यमातून बाधित कुटुंबांना योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल. मी स्वतः नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्यांच्या सर्व मागण्यांवर शासन, प्रशासन आणि कंपनी एकत्र बसून सकारात्मक तोडगा काढतील," असा मोठा दिलासाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >