अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) इराणच्या मध्य भागात एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. मध्य इराणमधील फळ आणि भाजीपाला बाजारात हे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
इराणी राज्य दूरदर्शननुसार हा अपघात इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ३३० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या इस्फहान प्रांतातील दोर्चेह शहरात झाला. इराणी वायुसेनेचा हवाई तळ इस्फहानजवळ स्थित आहे. इस्फहान हे इराणमधील प्रमुख अणुस्थळांपैकी एक मानले जाते. जून महिन्यात युनायटेड स्टेट ने इस्राइल - इराण युद्धादरम्यान याच अणुस्थळावर हल्ला केला होता. तसेच फोर्दो आणि नतान्झ या अणुस्थळांवरही बॉम्बहल्ले करण्यात आले होते.
4 people have been confirmed dead following a helicopter crash at a vegetable market in Dorcheh district of Khomeini Shahr, Iran’s Isfahan province. The helicopter was affiliated with the Army & was being used for training purposes at the time of the incident. pic.twitter.com/RQUVLpRbcq
— Iran's Today (@Iran) February 24, 2026
राज्य दूरदर्शनच्या माहितीनुसार हे लष्करी हेलिकॉप्टर प्रशिक्षण उड्डाणावर असताना दुर्घटनेचा शिकार झाले. या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बाजार परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष आणि धुराचे लोट दिसत असल्याचे दृश्य समोर आले आहे. इराणची अर्ध-सरकारी वृत्तानुसार, बाजारात उपस्थित असलेल्या आणखी दोन व्यक्तींचाही या अपघातात मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरात इराणमध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.
काही दिवसांपूर्वी इराणच्या पश्चिमेकडील हमदान शहराजवळ एक एफ-४ लढाऊ विमान कोसळले होते, ज्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. इराणला प्राणघातक विमान दुर्घटनांचा इतिहास आहे. पाश्चात्य निर्बंधांमुळे विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे इराण सरकार आणि व्यापारी विमान कंपन्या दोन्ही जुन्या हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ताफ्यावर अवलंबून आहेत.







