महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सचिन तेंडुलकर :
अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्राने राज्यभरातील लोकांसाठी काम करणारा एक समर्पित नेता गमावला आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती
बॉक्सर विजेंदर सिंह :
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि इतर अनेकांचा मृत्यू झाला. ही एक अत्यंत वेदनादायक आणि हृदयद्रावक घटना आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती!
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन :
माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि तेलंगणा सरकारमधील सार्वजनिक उपक्रम आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांनी एक्स वर पोस्ट केले, "अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीने मला खूप धक्का बसला आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य मिळो."
अजिंक्य रहाणे :
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.
युसूफ पठाण :
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण म्हणाले, "महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने खूप दुःख झाले. ते एक समर्पित नेते होते ज्यांनी अत्यंत वचनबद्धतेने आणि सचोटीने राज्याची सेवा केली. सार्वजनिक सेवा आणि राज्याच्या विकासातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल."
पीटी उषा :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अचानक निधनाने धक्का बसला आणि दुःख झाले. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असल्याने क्रीडा क्षेत्रात त्यांची अनुपस्थिती जाणवेल. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि समर्थकांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती,” पीटी उषा यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले.
पी.व्ही. सिंधू :
पी.व्ही. सिंधूने तिच्या ट्विटरवरुन अजित पवारांच्या निधनासंदर्भात शोक व्यक्त केला असून दादांच्या बारामती भेटीचं माझं स्वप्न अपूर्ण राहिल्याचंही म्हटलं आहे. तुम्हाला अनेकवेळा भेटण्याचे भाग्य मला लाभले. या भेटीत प्रत्येकवेळी तुमची शिस्त, तुमची कार्यपद्धती आणि तुमचे आपल्या लोकांप्रती असलेले प्रेम पाहून मी थक्क व्हायचे. तुम्ही मला नेहमी म्हणायचा, "माझ्या बारामतीला नक्की या.. "मला वाटायचं की, जाऊ या कधीतरी अजून खूप वेळ आहे, आपण निवांत जाऊ. मात्र, असं काही घडेल आणि मला बारामतीला न जाण्याचा असा पश्चात्ताप करावा लागेल, याचा विचारही मी कधी केला नव्हता अशी प्रतिक्रिया पी.व्ही सिंधून व्यक्त केली. तसेच, अपघातातील मृतांप्रती सहवेदना व्यक्त करत सिंधूने श्रद्धांजली अर्पण केली.






