Tuesday, May 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसावरकरांवरून राजकारण तापले

सावरकरांवरून राजकारण तापले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांना अपमानित केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार वारंवार काढणाऱ्या राहुल गांधी यांना चोख उत्तर देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातर्फे आजपासून सावरकर गौरव यात्रा सुरू झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात रामनवमीला दंगल घडवण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर येथून रविवारी या सावरकर गौरव यात्रांना प्रारंभ झाला. रविवारीच महाविकास आघाडीच्या रॅलीच्या निमित्तानेच सावरकर गौरव यात्रा आयोजित केली आहे. संभाजीनगर शहर हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने एक विशाल आखाडा यानिमित्ताने झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक भाजप आणि शिवसेनेतर्फे ही यात्रा काढली जाईल.

राहुल यांच्याकडून सावरकर यांच्या वारंवार अपमान करण्याचा मुद्दा इतका पेटला का? याचे उत्तर सहज समजण्यासारखे आहे. सावरकरांइतक्या असीम त्यागाची बरोबरी कुणीही नेता करू शकत नाही, हे सत्यच आहे. पण मुद्दा इतक्यापुरताच नाही. राहुल यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखर झाला आहे. उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना राहुल यांना हलकासा दम देत यापुढे सावरकरांबद्दल वाट्टेल ते आरोप सहन करणार नाही, असा इशारा दिला. पण त्यामुळे ठाकरे गट महाराष्ट्रात सावरकरांना मानणारा एका मोठा वर्ग आहे, त्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, हे चाणाक्ष भाजप आणि शिंदे यांच्या लक्षात आले. ठाकरे यांच्याकडे आता गमावण्यासारखे काहीही नसले तरीही ते भाजपचे आणि पर्यायाने शिंदे गटाचे नुकसान करू शकतात. याचा अचूक अंदाज या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आला. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी पण प्रत्यक्षात ठाकरे गटाने सावरकर यांच्या मुद्द्याचा राजकीय लाभ उठवू नये, म्हणून त्यांच्याकडून ही संधी हिरावून घेण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचा मुद्दा आणला आहे. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वाट्टेल ते बरळू नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचे सांगतात. पवार यांचे कार्यकर्ते कोणत्याही गोष्टीमागे पवारांची नसलेली खेळी कशी असते, हे सांगण्यात तज्ज्ञ आहेत. सावरकर यांच्यावरील वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नुकसान होण्याची शक्यता आहे, हे कुणालाही समजते. सावरकर यांच्यावर आरोप केले, तर यापुढे महाराष्ट्रातील जनता त्याचे उत्तर मतपेटीतून देईल, हे राहुल यांना स्वतःच समजायला हवे. त्यासाठी त्यांना पवार यांच्याकडून कानपिचक्या कशाला द्यायला हव्यात? पण, राहुल यांनी सावरकर यांच्यावर बोलणार नाही, असे जाहीर करून मामला आता थंडा केला असल्याने वातावरण शांत झाले असले तरीही हा निवडणुकीतील मुद्दा होऊ शकतो, हे भाजप आणि शिवसेनेच्या लक्षात आले आहे. दंगलग्रस्त संभाजीनगर जिल्ह्यातूनच यात्रा काढली गेली. यात्रेच्या आयोजनात महाराष्ट्र भाजपमधील मतभेद दिसणार नाहीत, यासाठी पंकजा मुंडेही यात्रेत सहभागी होणार आहेत. ठाकरे यांचे पिताजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सावरकर हे वंदनीय आणि आदरणीय होते. राजकारणात आपल्या भूमिका काहीही असोत, पण ऑप्टिक्सला महत्त्व असते. त्यामुळे ठाकरे यांनी राहुल यांना इशारा दिला असला तरीही ठोस कृती दिसली पाहिजे. वारंवार सावरकरांना अपमानित करणाऱ्या राहुल यांच्या काँग्रेसची साथ सोडावी, यासाठी सावरकर गौरव यात्रेमुळे अप्रत्यक्ष दबाव येणार आहे. अर्थात ठाकरे लगेच काही काँग्रेसची साथ सोडणार नाहीत.

महाराष्ट्रातील राजकारण इतक्या चमत्कारिक वळणावर पोहोचले आहे की, खुद्द पवार यांना आपला पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडी टिकवण्याची वेळ आली आहे. ठाकरे गटाकडे गमवायला काहीच शिल्लक नाही आणि काँग्रेसची अवस्था राज्यात नगण्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टिकली तर त्याचा लाभ केवळ राष्ट्रवादीला होणार आहे. म्हणून पवारांना मध्यस्थी करावी लागली. पण ही स्थिती लक्षात येऊनही ठाकरे आघाडीतून बाहेर पडू शकत नाहीत. राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकला नाही, तर पक्षाचे अस्तित्व शिल्लक राहील की नाही, याची चिंता पवारांना सतावते आहे. कारण आपले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, हे पवारांना चांगले माहीत आहे आणि राष्ट्रवादी सत्तेत राहिलाच नाही, तर मग पुढल्या योजनांचे काय, हा प्रश्न पवारांसमोर आहे. सावरकर गौरव यात्रा भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी केवळ एक इव्हेंट नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा कार्यक्रम आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याच राजकारणात कायम गांधी, गोडसे आणि सावरकर हेच तिघे जण केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्याभोवती देशाचे राजकारण फिरत राहिले आहे. सध्या गांधी आणि गोडसेंचा मुद्दा बाजूला पडला आहे. संघ आणि गोडसे यांच्यावर हल्ले करून मते मिळणे तर सोडा, पण चर्चाही होत नाही, असे राहुल गांधी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुद्दाम सावरकरांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. पण त्यांच्या सावरकरांप्रति अपमानास्पद वक्तव्यांचे भलतेच पडसाद राजकारणात उमटू लागतील, याची कल्पना राहुल यांनाही नसावी. राहुल यांना उत्तर देण्याच्या निमित्ताने पण अप्रत्यक्षात ठाकरे यांच्यावर दबाव आणण्यासाठी भाजप शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा आयोजित झाली आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीपर्यंत उमटत राहणार, हे निश्चित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -