घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे वैष्णवी कल्याणकर – गायकवाड.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरामध्ये तिचे बालपण गेले. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमधून तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. दहावीत असताना तिने नाटकात काम केले होते. त्यानंतर शिक्षणासाठी तिने मुंबई गाठली. डी. जी. रूपारेल कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. कॉलेजमधील डान्सच्या कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. त्यानंतर मार्केटिंगमधून तिने एम.बी.ए. केले. ॲक्सिस बँकेमध्ये काही काळ नोकरी केली. सर्व काही आलबेल सुरू होते, परंतु मन मात्र त्या कामामध्ये लागत नव्हते. अभिनयाच्या क्षेत्रात काहीतरी करावे असे सतत तिला वाटत होते. शेवटी तिने अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. बँकेची नोकरी सोडली.
https://prahaar.in/category/weekly/relax/
अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. ठिकठिकाणी जाऊन तिने ऑडिशन दिल्या… तिला ‘ बॅम्बू ‘ चित्रपट मिळाला.’ देवमाणूस २’ ही मालिका मिळाली. या मालिकेमुळे तिचे पदार्पण झाले. या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली. पुढे तिच्या करिअरमध्ये ‘ तू चाल पुढे’ही मालिका आली. ती तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरली. अभिनेत्री दीपा परबच्या मयुरी नावाच्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. आईने घेतलेल्या निर्णयाला ती पाठिंबा द्यायची. सकारात्मक भूमिका होती. एखादी गोष्ट जर चूक असेल तर त्याला चूक म्हणायची धमक तिच्यात होती. प्रेक्षकांना देखील तिची भूमिका खूप आवडली होती. दीपाचा भावनिक सशक्त अभिनय पाहून अनेक गोष्टी ती शिकली.
ती कोकणात सुट्टी घालविण्यासाठी गेली असता तिला एक फोन आला व तिला एका रहस्यमय चित्रपटात काम करण्याची ऑफर आली. तो चित्रपट तिने स्वीकारला, त्या चित्रपटाचे नाव होते ‘घबाडकुंड.’ प्रत्येकाला असे वाटते की एखादे घबाड आपल्याला मिळावे व आपण श्रीमंत होऊ. अशाच प्रकारच्या घबाडाची आणि त्याचा शोध घेणाऱ्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. घबाड म्हणजे अचानक धन प्राप्ती होणे, एखादी लॉटरी लागणे, नशीबच पालटणे असा त्याचा अर्थ होतो. कुंड म्हणजे विहीर किंवा पाणी जमा होणारी एखादी खोलगट जागा. या दोन्हीचे मिळून ‘घबाडकुंड ‘ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी भव्यदिव्य असा सेट पुण्याजवळील खेड शिवापूर येथे उभारण्यात आला होता. सतत नावीन्याचा ध्यास घेणारे प्रीतम एस. के. पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
https://prahaar.in/2026/05/03/books-made-it-so/
या चित्रपटामध्ये तुझी कोणती भूमिका आहे असे विचारले असता ती म्हणाली की या चित्रपटामध्ये मी मालकीण दाखवली आहे. या चित्रपटातील वाड्याची मी मालकीण असते. तीनशे वर्षांपासून गोष्ट चालत आलेली आहे. ती ८ ते ९ महिन्याची गरोदर दाखवली आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा तिच्यावर परिणाम होत असतो. शेवटी ती बाळाला जन्म देते का? तिचे पुढे काय होते? ती जिवंत राहते की मरते या साऱ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पहायला मिळतील.
‘घबाडकुंड ‘या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता असे विचारल्यावर ती म्हणाली की प्रीतम सोबत मी पहिल्यांदाच काम करीत होते. सेटवर ते अत्यंत हम्बल असायचे. एखाद्या कलाकाराला काही सांगायचे असल्यास माईकवरून न सांगता ते त्यांच्या जवळ जाऊन सांगायचे. कोणत्याही कलाकारांचा अपमान होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. सेटवर कलाकारांना रिलॅक्स वाटेल असे वातावरण असायचे. शशांक शेंडे, कुशल बद्रिके, संदीप पाठक हे अभिनयातले मातब्बर कलाकार या चित्रपटामध्ये होते. संदीप पाठक सोबत माझे काही सीन होते. त्यांचे कधीही माझ्यावर दडपण आले नाही.
https://prahaar.in/2026/05/02/all-the-artists-here/
‘घबाडकुंड ‘ चित्रपटात रहस्य, थरार, विनोदाच्या जोडीला नात्यांची गुंतागुंत प्रेक्षकांना पहायला मिळेल. घबाडाचा शोध घेताना अनाहूतपणे एकमेकांवर दाखवला जाणारा अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारे संशयी वातावरण प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढवेल असा विश्वास वैष्णवी कल्याणकर – गायकवाडने व्यक्त केला.
-युवराज अवसरमल