सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या नाट्यकृती आणि चित्रपट मोठ्या संख्येने प्रदर्शित होताना दिसत आहेत. एकीकडे उष्म्याने जीव कासावीस होत असताना, मराठी रंगभूमी आणि रूपेरी पडद्यावर मात्र अनेकविध कलाकृतींची तुफान बरसात सुरू आहे. साधारणपणे दर आठवड्याला प्रदर्शित होणारे चित्रपट आणि नाटके यांची संख्या पाहता ‘उदंड जाहल्या कलाकृती’ असेच एकंदर चित्र सध्या आहे. त्या दृष्टीने, रसिकांना रंगमंच आणि पडद्यावर ऐन उन्हाळ्यात गारवा अनुभवण्यास मिळत आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मराठी रूपेरी पडद्यावर काही महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होत असून, रसिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला एका बहुचर्चित चित्रपटाचा ‘सिक्वेल’ कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असल्याचे आकडे समोर येत आहेत. शालेय सुट्ट्यांचा काळ लक्षात घेता ‘टारगेट ऑडियन्स’ म्हणून नाट्यसृष्टीत बच्चेमंडळीना लक्ष्य केले जात आहे. मराठी रंगभूमीवर सध्या बालनाट्यांना मोठा बहर आला असून एकाच तिकिटात दोन किंवा तीन बालनाट्ये, हा गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला ‘ट्रेंड’ आताही ऐन फॉर्ममध्ये असल्याचे चित्र आहे.
https://prahaar.in/category/weekly/
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर तर अगदी सगळे हंगाम एकत्र आल्याचे दिसून येत असून, दर आठवड्याला नवीन नाटकाच्या होणाऱ्या घोषणा रसिकांनाही अचंबित करत आहेत. चित्रपट आणि मालिकांमधले कलाकार मोठ्या प्रमाणावर मराठी नाटकांत दिसून येत असून, त्यांची लोकप्रियता ‘कॅश’ केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. उदंड झालेल्या नाटकांमुळे नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्यासाठी मोठी कसरत सुरू आहे. व्यावसायिक नाटकांच्या बाबतीत असे एकंदर चित्र असताना, प्रायोगिक रंगभूमी सुद्धा यात मागे पडलेली नाही. अर्थात या नाटकांचे प्रयोग मोजकेच होत असले, तरी सतत काहीतरी नवीन द्यायचे; ही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि रसिकही त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांची पायरी चढताना रसिकांच्या दृष्टिकोनातून तिकिटाविषयी विचार केला, तर साहजिकच चित्रपट पाहणे रसिकांना परवडते. मात्र नाटक ही जिवंत कला असल्याने, जरा हात सैल सोडत रसिकजनांची पावले नाट्यगृहांकडेही वळत आहेत. अर्थात काही नाटके चालतात, तर काही चालत नाहीत; तो त्यांच्या ‘कन्टेन्ट’चा भाग आहे. परंतु नवीन येणाऱ्या नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी आणि आवडीच्या कलावंतांना प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नाट्यवेडे रसिक नाट्यगृहांकडे मोर्चा वळवत असल्याचे चित्र आहे.
https://prahaar.in/2026/05/30/major-action-taken-in-toxic-liquor-case-senior-inspector-sanjay-mogle-of-hadapsar-police-station-and-three-others-suspended/
केवळ कलावंतच नव्हे; तर नवनवीन विचारांचे लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञही सध्या या क्षेत्रांत मोठ्या संख्येने आहेत. नवीन नाटकेच नव्हेत; तर पुनरुज्जीवित नाटकांचेही प्रयोग सध्या धडाक्यात रंगताना दिसत आहेत. काही नाटकांनी तंत्रज्ञानातही आघाडी घेतली आहे आणि अत्याधुनिकतेची कास धरत ही नाटके सादर होत आहेत. मात्र असे असले, तरी तिकीट बारीवर एक वेगळा सूरही आळवला जात आहे. नाट्यसृष्टीत सध्या नाटके उदंड झाली असली, तरी सर्वकाही आलबेल आहे अशातला भाग नाही. काही नाट्यनिर्मात्यांचे चेहरे खुललेले दिसत असले, तरी काहीजण मात्र तिकीट बारीवरचा ‘प्लॅन’ रंगणार कधी, या विचारात अडकलेले दिसत आहेत. काही नाटके निर्मात्यांना पैसा वसूल करून देत आहेत; तर दुसरीकडे, नाटकाला बुकिंग नाही म्हणून वेगळा सूरही आळवला जात आहे. मग इतकी नाटके, नाट्यसृष्टीला किती फायद्याची आहेत; असा प्रश्नही आहेच. घराबाहेर पडून आस्वाद घेता येणारी नाटके आणि चित्रपट यांच्या व्यतिरिक्त, ‘घरबसल्या मनोरंजन’ या व्याख्येत येणाऱ्या दूरचित्रवाणीवरच्या मालिका म्हणजे रसिकांच्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. सकाळ, संध्याकाळ या मालिका घराघरांत सुरूच असतात आणि या मालिका पाहणारा रसिकवर्गही मोठा आहे. काही वाहिन्यांनी तर त्यांच्या महत्त्वाच्या मालिकांचे प्रक्षेपण आता दुपारच्या वेळेत सुरू केल्याने, रसिकांची ऐन उन्हाळ्यातली दुपारही आता थंडगार झाली आहे.
https://prahaar.in/2026/05/03/books-made-it-so/
रूपेरी पडद्यावरही सध्या काही ठराविक चित्रपटांच्या नशिबीच कोटीचे आकडे पार करण्याचे भाग्य दिसते. अशावेळी, असंख्य चित्रपट प्रदर्शित होऊनही चित्रपटांना खरेच उर्जितावस्था आली आहे का, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सध्या उदंड झालेली नाटके आणि चित्रपट पाहता, केवळ संख्या हाच एक निकष धरला, तर मात्र ऐन उन्हाळ्यात रंगभूमी व रुपेरी पडद्यावर जाणवणारा गारवा या संबंधित मंडळींना आणि रसिकजनांना सुखावत आहे, असेच म्हणावे लागेल.