Sunday, April 28, 2024
Homeकोकणरत्नागिरीKodavali-Arjuna : कोदवली-अर्जुना गाळमुक्तीसाठी राजापूरकरांची वज्रमूठ

Kodavali-Arjuna : कोदवली-अर्जुना गाळमुक्तीसाठी राजापूरकरांची वज्रमूठ

गाळ उपशासाठी १०० टक्के लोकसहभागाची हमी

राजापूर (प्रतिनिधी) : शहरातील कोदवली आणि अर्जुना (Kodavali-Arjuna) नदीपात्रातील गाळ उपशासाठी १०० टक्के लोकसहभागाची हमी देताना राजापूर शहर गाळमुक्तीचा निर्धार राजापूरवासीयांनी केला आहे.

मंगळवारी झालेल्या लोकसहभाग सभेत तशी ग्वाही नाम फाऊंडेशन आणि प्रशासनाला देतानाच अनेकांनी आर्थिक मदत जाहीर करत या चांगल्या कामाला हातभार लावला आहे, तर भविष्यात सर्व प्रकारचे सहकार्य करताना राजापूर शहर गाळमुक्त करण्याचा निर्धार या बैठकीत राजापूरवासीयांनी केला आहे, तर यासाठी सहकार्य दर्शविणाऱ्या नाम फाऊंडेशनचे आभार व्यक्त करताना राजापूर शहर गाळमुक्तीसाठी पुढाकार घेणारे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांचे उपस्थितांनी कौतुक करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही यावेळी दिली.

राजापूरच्या नावातच राजे आहे त्यामुळे गाळ उपशासारख्या चांगल्या कामासाठी निधी कमी पडणार नाही याची खात्री बाळगा, असे नमुद करत महसूल प्रशासन आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही यावेळी राजापूर तहसीलदार तथा गाळ निमुर्लन समिती उपाध्यक्षा शीतल जाधव यांनी यावेळी दिली.

शहरातील कोदवली आणि अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसाकामी सामाजिक संस्था नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. राजापूर नगर परिषद, महसूल प्रशासन आणि लोकसहभागातून राजापूरच्या या दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. याच्या नियोजनासाठी मंगळवारी २२ नोव्हेबर रोजी राजापूर नगर वाचनालय सभागृहात लोकसहभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते.

राजापूर तहसीलदार तथा गाळ निमुर्लन समिती उपाध्यक्षा सौ. शीतल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकसहभाग सभेत व्यासपीठावर मुख्याधिकारी प्रशांत भोसले, नाम फाऊंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, तांत्रिक विभागाचे अभिलाष कोकरे, अजिंक्य राऊत, राजेश्वर देशपांडे, अजिंक्य राऊत, राजापूरचे लेखापाल नीलेश पाटणकर, नगर परिषदचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव, जलसंपदाचे उपअभियंता विजय आंबलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी नगर परिषदेच्या वतीने राजापूर शहर पुर्वीचे आणि आताचे, नद्यांमधील गाळ, त्यामुळे येणारा पूर याची एक चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. प्रास्ताविक नगर परिषदचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव केले, तर मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी कोदवली आणि अर्जुना नद्यांतील गाळ उपशाबाबत माहिती देत या कामात आपण सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी बोलताना नाम फाऊंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर यांनी नाम फाऊंडेशनच्या कामाची माहिती देतानाच राजापुरातील गाळ कशा प्रकारे उपसला जाईल व नामचा यात काय सहभाग राहील याची माहिती दिली. कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी इंधन व इतर असा सुमारे १६ ते २५ लाख इतका खर्च अपेक्षित असून अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाला मोठा खर्च अपेक्षित असून यासाठी शासनाची मदत घ्यावी लागेल, असे सांगितले.

यासाठी यंत्रसामुग्री नाम फाऊंडेशन पुरवणार असून इंधन खर्च लोकसहभागातून करावयचा असल्याचे त्यांनी नमूद केले. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली नदीपात्रातील गाळही उपसला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, तर नामचे तांत्रिक विभागाचे अभिलाष कोकरे यांनी कोदवली नदीपात्रात सुमारे १ लाख घनमिटर इतका गाळ असून आयटीआय पुलापासून पुढे कै. वासुकाका जोेशी पूल, जवाहर चौकातील पुलापासून खाली कै. वैश्यंपायन गुरुजी पूल ते पुढे खाली अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या संगमापर्यंत गाळ उपसला जाणार असल्याचे सांगितले, तर अर्जुना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ असून यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -