Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमाणसांसाठी आसुसलेली माणसे... अन् बंद घरे

माणसांसाठी आसुसलेली माणसे… अन् बंद घरे

माझे कोकण: संतोष वायंगणकर

पंचविस वर्षापूर्वीचं कोकण ज्यांनी पाहिलय, अनुभवलेय त्यांना पूर्वीच्या माणसांनी भरलेली घरं आणि वाडी-वस्तीत दोन-पाच फक्त नावाला उघडी असणारी घरं आणि आजूबाजूला घर मालकाची वाट पहाणारी घरं असं विदारक; परंतु वास्तववादी चित्र अखंड कोकणात आहे. प्रगती ही होतच रहाणार, ती व्हायलाच हवी. प्रगती कोणाला थांबवता येत नाही. पूर्वी जे गावात, शेती, फळ बागायतीतून जे मिळायचे त्यात आनंद मानून समाधानानं राहणारी माणसं होती. गरजा, आवश्यकता यांना मर्यादेचं आपोआपच कुंपन होतं. कोणतीही स्पर्धा नव्हती. पण गावात वितंडवाद नव्हतेच असं नाही. असे वाद पुष्कळ, अगदी पैशाने पासरी म्हणावे असे होते; परंतु त्यातही कोकण भरलेले गजबजलेलं होतं.

गावात म्हणाल, तर एखादी स्कुटर, सायकल चालवणाऱ्यांची आणि दारात सायकल असणाऱ्यांची संख्याही फारशी नव्हती. पण परोपकारी वृत्ती मात्र तशीच होती. अनेक चांगल्या गोष्टी होत्या. ज्याचे आपोआप संस्कार होत राहिले. शाळेत शिक्षक पोटतिडकीने शिकवायचे. मुलंही घरच्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत करीत. काही मुलांना अंगावर कपडे नाहीत म्हणून शाळेतही जाता येत नव्हते. पण तरीही शिकण्याची आणि मुलांनी शिकावं म्हणून धडपडणारे आई-बाप होते. गावात राहणाऱ्यांना त्याकाळी कुणाला कुणाचीच भिती म्हणून वाटायची नाही. आजच्यासारखे रोगही नव्हते आणि डॉक्टर आणि रुग्णांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य तपासणाऱ्या मशीनरीही नव्हत्या. पण कुठल्यातरी झाड-पाल्याच्या औषधाने गावातील रुग्ण दोन दिवसांत हिंडता-फिरता व्हायचा. आज सारेच बदललेय. हा बदल इतका होत गेलाय की, गावा-गावातून माणसांची संख्याच नगण्य होत चालली आहे. पूर्वीची हसती-खेळती कुटुंबे कुलूपबंद घर पाहिल्यावर अस्वस्थ व्हायला होतं. गेल्याच आठवड्यात एका ओळखीच्या गावात जाणं झालं. सत्तरीपार केलेली आजीबाई आणि असं चौकटीतले कुटुंब राहातं. खूप गप्पा झाल्या.

बोलता-बोलता सत्तरवर्षीय महिला काहीशा भावुक झाल्या आणि म्हणाल्या, माझी मुलं मला खूप चांगलं करतात. पण दिवसभर घरात माणसं नाहीत. शेजारच्या घरातूनही जी आहेत, ती वयोवृद्ध माणसं स्वत:चा तोल सावरता न येणारी… यामुळे कधी-कधी वृद्धाश्रमात माणसांमध्ये जावं असं वाटते. वयोपरत्वे मनही खूप घाबरते. गावात शेजारी-पाजारी कोणी नाहीत. कधी-कधी काहीच सूचत नाही, असं त्या म्हणाल्या. खरंतर त्यांनी जे बोलता-बोलता सांगितले, पण गावात शेजारी कोणी माणसं नाहीत, हेच त्यांच्या घाबरण्याचे कारण आहे. अर्थात गावाकडे कोणत्या रोजगाराच्या फार संधी नाहीत. असल्याच तरी दिवसभर कामावर तर जावच लागणार… नाहीतर कुटुंब कसं चालणार, असे नानाविध प्रश्न समोर उभे झालेले असतात.

अखंड कोकणातील प्रत्येक गावात ही अशीच स्थिती आहे. पूर्वीच्या भरलेल्या घरातील कुटुंबीय पोटापाण्यासाठी शहराकडे वळलेले आहेत. गावात काही मोजके तरुण शेती करून नवीन काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात. या प्रयोगशीलतेतून काही तरुणांनी आपल्या कुटुंबात सधनताही आणली आहे. अर्थात जबाबदारी ही वय पाहून येत नाही. ही येणारी जबाबदारी पुढील कर्तव्य पार पाडण्यासाठीच खांदे मजबूत करून जातात, एवढ मात्र खरं. मुंबईत ज्यांचं मन रमत नाही, ज्यांची गावात घरं आहेत आणि सेवानिवृत्ती घेतली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी गावी यायला पाहिजे. ही बंद असलेली घर उघडी राहतील, हे पाहिले पाहिजे. आपल्या घराच्या शेजारी असणारी वयोवृद्ध माणसं बोलण्यासाठी आसुसलेली आहेत. त्यांना त्यांच्याशी कोणीतरी बोलणारं हवं आहे. व्हॉट्सअॅपमध्ये रमणारी आजची पिढी असली तरीही पूर्वीच्या या वृद्धाला संवादातून आनंद मिळतोय. खरं तर यावर समाजाने वेळीच विचार केला नाही तर आपल्याच घरची माणसं त्यांच्याशी संवाद साधायलाच कोणी नाही, म्हणून अबोल होऊन जातील. ही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

शिक्षणासाठी परदेशात जाणारी मुलं भारतात परतायच्याच मानसिकतेत नाहीत. शिकायला म्हणून परदेशात जातात. तिथलं रहाणीमान, चौकटीतल विश्व, स्वच्छता आणि बरच काही या सर्वांमध्ये ही मुलं फार रमतात आणि ज्या देशात जातात, मग तिथलीच होऊन जातात. शहरात आणि गावात आई-वडील व्हीडिओ कॉलच्या संभाषणात आनंद मानतात. मुलगा, सून, मुलगी परदेशात असल्याचा अभिमान बाळगतात, अभिमानाने समाजालाही सांगतात; परंतु मनातून मात्र ही माणसं फार दु:खी असतात. मुलं आपल्यासोबत नाहीत, या कल्पनेनेच त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपसूकच ओलावतात. सध्या कोकणात काय आणि शहरात काय हीच स्थिती आहे. अस्वस्थ मनांच्या माणसांना दररोजच्या चार शब्दांतूनही जगण्यासाठी उभारी मिळू शकते. यासाठीच गावाकडच्या घरात एखाद कुटुंब तरी वावरले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -