Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणनिलेश राणेंचा शिवसेनेला झटका

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका

कुडाळ पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये

मुख्यमंत्र्यांचा पायगुण!

कुडाळ (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत परतून काही तास उलटत नाहीत तोच माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री शनिवारी सिंधुदुर्गात येऊन गेले. म्हणूनच हा धक्का दिला आहे. ही तर सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेक लोकांचा विश्वास नाही, हे दाखवण्यासाठी कुडाळमधील तीन पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे १०, तर भाजपचे संख्याबळ ८ आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ ८ वरून ११, तर शिवसेनेचे संख्याबळ १० वरून ७ वर घसरले आहे.

शिवसेना कधी संपेल कळणारही नाही

शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही. सुरुंग लावला आहे. अनेकजण कुंपणावर आहेत. शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही. ती वेळ लांब नाही. आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे, असा दावाही त्यांनी केला.

नवाब मलिक, तोंड उघडायला लावू नका

निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात. ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज विकतो, हेच तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग्ज अॅडिक्टला साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

संवादासारखं राहिलं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात संवाद झाला नाही. त्यावरही त्यांनी मिष्किल भाष्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्यासारखं काही नाहीच नव्हतं. नारायण राणे मनात ठेवून काही वागत नाहीत. उद्धव ठाकरे कुजक्या मनाचे आहेत. त्याला आमचे साहेब काय करणार? असा सवालही माजी खासदार निलेश यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -