Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीमनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय गुप्त बैठकीत घेतल्याचा एनआयएचा खळबळजनक दावा

मनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय गुप्त बैठकीत घेतल्याचा एनआयएचा खळबळजनक दावा

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मलबार हिल येथे एक गुप्त बैठक झाली, जिथे त्यांनी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि या बैठकीत शर्मा यांना हे काम सोपवण्यात आले, असा खळबळजनक दावा एनआयएने कोर्टात केला आहे.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घर, अँटिलियाच्या बाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल २० जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. तसेच अंबानी कुटुंबातील सदस्यांना धमकी देणारी चिठ्ठी देखील होती. तसेच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता.

एनआयएच्या खटल्यानुसार, हिरेन यांच्या मालकीची कार वाझे यांनी अंबानी कुटुंबाच्या निवासस्थानाबाहेर पार्क केली होती. तसेच एनआयएने दावा केला की, हिरेन यांना या कटाबद्दल बरीच माहिती असल्याने आणि त्यांनी या कटाबद्दल कुठे वाच्यता केल्यास शर्मा, वाझे आणि अटकेत असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांना त्यांच्या या कटातून लाभ मिळवणे अवघड गेले असते.

एनआयएने पुढे सांगितले की, अंबानींच्या घराबाहेर वाहन लावल्यानंतर दोन दिवसांनी शर्मा आणि वाझे यांची मलबार हिल येथे गुप्त बैठक झाली. एजन्सीने म्हटले आहे की, कॉल डिटेल रेकॉर्डवरून ही माहिती कन्फर्म झाली आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की या बैठकीत हिरेन यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि हे काम शर्मा यांना देण्यात आले होते आणि ते त्याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी वरळी सी फेस येथे गेले होते.

एनआयएने दावा केला आहे की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाझे यांना चौकशीसाठी बोलावले तेव्हा त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका नाकारली आणि तपासात दिशाभूल केली.

एनआयएने असाही दावा केला आहे की वाझे खूप प्रभावशाली होते आणि म्हणूनच हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला नव्हता. तर या घटनेत अपघाती मृत्यूची नोंद केली होती. ते पुढे म्हणाले की अटक करण्यापूर्वी वाझे हे सीआययू युनिटचे प्रमुख होते, त्यामुळे जामिनावर सुटल्यास ते साक्षीदारांचा शोध घेऊन त्यांना प्रभावित करू शकले असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -