Sunday, May 5, 2024
Homeमहामुंबईमराठी भाषेच्या पाट्यांसाठी महापालिका उदासीन

मराठी भाषेच्या पाट्यांसाठी महापालिका उदासीन

युवा सेनेचे आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वच आस्थापना, दुकाने, कार्यालये व व्यवसायांच्या पाट्या या मराठी भाषेतच असाव्यात. यासंबंधीचा निर्णय मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून झाला. त्यानंतर विधी मंडळातही दुकाने तसेच विविध आस्थापनेतील फलकांवर मराठी भाषाच असावी, यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शासनाकडून त्यासंबंधी लेखी आदेशही त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरितही करण्यात आला. राज्य सरकारकडून आदेश आलेले असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासन मराठी पाट्याप्रकरणी उदासीनता दाखवित असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे.

मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेचे पदाधिकारी महेंद्र कासूर्डे, नीलेश पाटणे व युवा सेनेचे प्रवीण वागराळकर यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगार यांची भेट घेत मराठी पाट्यांची मागणी केली. मराठी भाषा ही मातृभाषा आहे. या भाषेचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून शासकीय व खासगी कार्यालयात मराठी भाषेत कामकाज व्हावे यासाठी राज्य शासनाने राज्य भाषेचा खास प्रस्ताव आणून तीन महिन्यापूर्वी मंजूरही केला. त्याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कामकाज मराठी भाषेतच चालावे, यासाठी एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

त्यामध्ये दुकानांवरील म्हणजेच विविध व्यावसायिकांच्या व्यवसायावर आपल्या व्यवसायाची ओळख दाखविण्यासाठी ज्या पाट्या लावल्या जातात. त्यावर मराठी भाषेत व्यवसायाची नावे असावीत, अशा प्रकारचा आदेश शासनाकडून त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला वितरित करूनही त्यावर आजतगायत कार्यवाही झाली नसल्याने युवा सेना आक्रमक झाली आहे.

देशातील इतर राज्याची तुलना करता बहुतांशी राज्यात आपल्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. या राज्यातील सर्व व्यवहार त्यांच्या मातृभाषेतच चालत आहेत; परंतु आपल्या राज्यातील शासनाने मराठी भाषेत पाट्या लावाव्यात, अशा प्रकारचा आदेश वितरित केला असतानाही कार्यवाही होत नाही म्हणून युवा सेनेने व्यवसायाच्या पाटीवर मराठी देवनगरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या भाषेच्या तुलनेने लहान असता कामा नयेत. जेणेकरून मराठी नाव हे मोठे पाहिजे, अशा प्रकारचे निवेदनात म्हटले आहे.

शासनाकडून मागील तीन महिन्यांपूर्वी दुकांनाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात म्हणून आदेश दिले. पण पालिकेकडून यावर काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. वास्तविक पाहता मराठी पाट्या हा विषय शासनाचा आहे. त्यावर जलदगतीने कार्यवाही होणे अपेक्षित आहे; परंतु पालिका प्रशासन आढेवढे घेत आहे. यामागे कारण तरी काय आहे? असेही निवेदन देताना आयुक्तांना विचारला. तसेच लवकरात लवकर मराठी भाषेच्या पाट्या विषयी कार्यवाही व्हावी व टाळाटाळ करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबईतील व्यावसायिकांच्या व्यवसायांच्या पाट्यासंबंधी लवकरात लवकर कार्यवाही होईल. त्यासंबंधी आदेश काढले जातील. – अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -