Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीअवकाळी पावसाचा मंत्री, आमदारांना फटका

अवकाळी पावसाचा मंत्री, आमदारांना फटका

अधिवेशनाच्या कामकाजावरही परिणाम

मुंबई : आज सकाळी मुंबईत जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावरही झाला. अनेक आमदार, मंत्र्यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे विधानसभेत अर्धा तास चर्चा पुढे ढकलत त्याजागी लक्षवेधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून विधानसभेचे कामकाज सुरू होणार होते. मात्र, मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अनेक आमदार, मंत्री वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनी अर्धा तास चर्चा पुढे ढकलून त्याजागी लक्षवेधी सुरू करत असल्याचे सांगितले.

महागाईवरुन विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटच्या आठवडा सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. उद्या गुढीपाडवा आहे. त्यापार्श्वभूमीवर आज हातात गुढी घेऊन विरोधकांनी अनोखे आंदोलन केले. ‘उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी; सरकार गुढी घरी उभारू की शेजारी?’, ‘वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सांगा कशी करू खरेदी? कशी उभारू गुढी?’, असे फलक दाखवत विरोधकांनी घोषणाबाजी केली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजीही विरोधकांनी केली.

चाकरमान्यांचीही उडाली तारांबळ 

मुंबईसह उपनगरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही परिणाम झाला. अवकाळी पावसामुळे उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक सकाळी काही वेळासाठी विस्कळीत झाले होते. यामुळे कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचीही तारांबळ उडाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -