Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलMissile : अग्निबाणाचे प्रक्षेपण

Missile : अग्निबाणाचे प्रक्षेपण

  • कथा : प्रा. देवबा पाटील

अग्निबाणाची संपूर्ण यंत्रणा नीट काम करीत आहे की, नाही हे तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असते. चुकून एखादी लहानशी त्रुटी जरी नजरेतून सुटली तरी ती संपूर्ण अवकाशयान नष्ट करण्यास कारणीभूत ठरू शकते.

दीपा व संदीप हे दोघे बहीण-भाऊ मधल्या सुट्टीत आपल्या शाळेच्या व्हरांड्यातून गप्पा मारत जात होते. त्यांच्या भारताने नुकत्याच विकसित केलेल्या अग्निबाणाबद्दल गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात समोरून त्यांचे विज्ञानाचे शिक्षक आलेत. त्याच्या गप्पा ऐकून सरांनी त्यांना काय गप्पा सुरू आहेत म्हणून विचारले.

“सर, अग्निबाणातील इंधन म्हणजे काय असते?” संदीपने प्रश्न केला.

“उष्णता व प्रकाश मिळवण्यासाठी जी वस्तू जाळतात तिला इंधन म्हणतात. ज्वलनाची प्रकिया ही रासायनिक प्रक्रिया असते. इंधनाचा हवेतील प्राणवायूसोबत संयोग होतो व त्यांच्या ज्वलानामधून ऊर्जा निर्माण होते. ती उष्णता व प्रकाश यांपासून निर्माण होते.” सर म्हणाले.

“ते अग्निबाणात कोठे ठेवलेले असते सर?” पुन्हा संदीपनेच प्रश्न केला.

सर पुढे म्हणाले, “तर अग्निबाणाच्या मजबूत नळकांडीच्या तळाशी एक खास प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांचे व प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्­या रसायनांचे मिश्रण म्हणजे इंधन ठासून भरलेली एक टाकी असते. अग्निबाणाची वात पेटविल्यानंतर वातीमधून ती आग इंधनापर्यंत जाते आणि त्याचे अत्यंत वेगाने ज्वलन होते. त्याच्या ज्वलनातून तेथेच खूप मोठे आकारमान असलेला अति तप्त वायू तयार होतो. त्याचा अग्निबाणाच्या नळकांड्यामध्ये खूप दाब वाढत जातो. अग्निबाणाच्या शेपटीत खालच्या बाजूला असलेल्या छिद्रातून हा वायूचा झोत खूप वेगाने व जोराने बाहेर पडतो व जमिनीवर जोराने आदळतो. या वायूचा प्रचंड दाब जमिनीवर पडतो. वायूच्या या जमिनीवर आदळण्याच्या रेट्यामुळे म्हणजेच या प्रचंड दाबाच्या शक्तीची प्रतिक्रिया अग्निबाणाला तशाच वेगाने व जोराने विरुद्ध दिशेने म्हणजे आकाशात वर फेकते. असे अग्निबाणाचे आकाशात उड्डाण होते. अशा रीतीने ज्वलनातून निर्माण झालेल्या उष्ण वायूंच्या झोतानेच अग्निबाण पुढे जातो म्हणजे आकाशात वर जातो. तो समतोल राहून सरळ मार्गाने त्याचे उड्डाण व्हावे यासाठी त्याला खाली तीन त्रिकोणी शेपट्या असतात.”

“या अग्निबाणात कोणते इंधन वापरतात?” दीपाने विचारले.

सर म्हणाले, “अग्निबाणामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेळ्या प्रकारची इंधने वापरतात. अग्निबाण लहान असेल व त्याचा पल्ला फार मोठा म्हणजे जास्त दूरचा नसेल ता त्यात घन स्वरूपातील इंधन वापरतात. अंतराळात खूप दूरवर जाणा­ऱ्या अग्निबाणात मात्र द्रव इंधन वापरतात. त्यात केरोसिन किंवा द्रव हायड्रोजनचा समावेश असतो. इंधनाचे योग्य ज्वलन होण्यासाठी त्याला प्राणवायूचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी द्रव स्वरूपातच प्राणवायूही इंजिनाच्या टाक्यांमध्ये भरून ठेवतात. हल्ली द्रवरूप प्राणवायू व अल्कोहोल यांचेही मिश्रण वापरतात.”

“उपग्रह आकाशात सोडताना उलटी गणना का करतात?” संदीपने विचारले.

सर सांगू लागले, “कोणताही उपग्रह अथवा अवकाशयान हे अग्निबाणाद्वारे आकाशात प्रक्षेपित करण्याआधी त्या अग्निबाणातील सर्व उपकरणे व्यवस्थित आहेत किंवा नाहीत, त्याची संपूर्ण यंत्रणा नीट काम करीत आहे किंवा नाही हे तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असते. चुकून एखादी लहानशी त्रुटी जरी नजरेतून सुटली तरी ती संपूर्ण अग्निबाण व उपग्रह वा अवकाशयान नष्ट करण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून संशोधक तंत्रज्ञ अग्निबाण आकाशात सोडण्याआधी त्याच्या प्रत्येक बारीकसारीक भागाची काटेकोरपणे तपासणी करतात. तत्पूर्वी प्रत्येक भागाला किंवा टप्प्याला एक ठरावीक नंबर देतात आणि नंतर उलट गणना म्हणजेच अधोगणनी करीत सूक्ष्म तपासणी सुरू करतात. जेव्हा सर्वात शेवटी ही गणना शून्यापर्यंत पोहोचते, तेव्हा अग्निबाणाची संपूर्ण तपासणी पूर्ण झाली असून ते आता सुव्यवस्थितपणे सुटण्याच्या तयारीत आहे हे निश्चित होते; परंतु गणनेदरम्यान तपासणी सुरू असताना जर अग्निबाणामध्ये एखादीही त्रुटी आढळली, तर ही गणना मध्येच थांबवली जाते. त्या त्रुटीची दुरुस्ती झाली की सर्वसाधारणपणे पुन्हा जेथे उलटी गणना थांबवलेली असते त्या पायरीपासून पुन्हा ती उलटी गणना सुरू करतात.”

“यात जर शून्यापासून गणना सुरू केलेली असली तर चढत्या क्रमात शेवटी एखादेवेळी अग्निबाणाच्या सर्व यंत्रणेची नीटपणे तपासणी पूर्ण झाली का नाही हे लक्षात येणे कठीण जाते. कारण एखादेवेळी चुकून अगोदरच्या क्रमांकावरच गणना पूर्ण केली जाऊ शकते वा एखादा भाग चुकून सुटून एखाद्या क्रमांकाने गणना पुढेही जाऊ शकते. उलटी गणना केल्याने बरोबर शून्याजवळ गणना थांबते आणि त्यामुळे अग्निबाणाची संपूर्ण यंत्रणा निर्दोष व सुरळीत असल्याची खात्री होते. उलट्या गणनेचा अर्थच असा असतो की, आम्ही एकेक त्रुटी काढून टाकत अशा स्थितीकडे जात आहोत की जेथे कोणतीही त्रुटी शिल्लक राहत नाही.” सरांनी स्पष्टीकरण दिले.

“बरे आता मधली सुट्टी संपली. तुम्ही वर्गात जा.” सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या वर्गात गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -