Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमहिलांनो, वेळ निघून गेली असं समजू नका

महिलांनो, वेळ निघून गेली असं समजू नका

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

समुपदेशन दरम्यान अनेक महिला स्वतःला एकाकी, एकट्या समजत आहेत हे लक्षात येते. सुखी संसार, अनुरूप जोडीदार, सर्व भौतिक सुख असून देखील मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक सल त्यांना जाणवत असते. अनेकांचा असा गैरसमज असतो की, एकदा ठरावीक वय ओलांडलं की, माणूस विशेषतः महिला करिअर वगैरे काही करू शकत नाही; परंतु करिअर म्हणजे असलेल्या शिक्षणाच्या अनुषंगानेच एखादी नोकरी अथवा व्यवसाय वर्षानुवर्षे करणे आणि भरभक्कम पगार मिळवणे, असा अर्थ होत नाही.

आपल्यात अनेक सुप्त कला, गुण, छंद, सामर्थ्य असते. याला व्यवस्थित आकार दिला, त्यात थोडा फार सराव केला तरी आपण त्या विषयात प्रगती करू शकतो. करिअर हे फक्त उत्पन्न मिळवण्यासाठीच नसून आपल्याला आपल्या आयुष्याला ओळख मिळण्यासाठी केलेला कोणताही उपक्रम, अशी कोणतीही अॅक्टिव्हिटी ज्यातून आपण आनंद प्राप्त करू शकू, असे कोणतेही योगदान ज्यातून आपली एक प्रतिमा तयार होईल. हे सर्व करण्यासाठी निश्चितच वयाचे बंधन नसते. लोकांनी आपल्यावर बंधन घालण्यापेक्षा आपणच आपल्याला एका साच्यात अडकवून ठेवलेले असते.

आम्हाला चालत नाही, आमच्यात हे आवडत नाही, आमच्या घरी याला परवानगी नाही, आम्हाला हे जमूच शकत नाही, असा काहीच अनुभव आम्हाला नाही, संधीच मिळत नाही, स्पर्धा खूप आहे, अशी नानाविध कारणे आपणच आपल्याला सांगत असतो. जगात कोणीच तुम्हाला हात धरून पुढे आणणार नाही, कोणीही स्वतःहून तुम्हाला मोठेपणा देणार नाही, घरातून प्रत्येक स्त्रीला दाबण्याचाच प्रयत्न होतो. खूप कमी ठिकाणी महिलांना स्वतःसाठी वेळ आणि वाव देता येतो. हे करण्याची ऊर्मी स्वतःच्या अंतर्मनातून आली तरच ते शक्य आहे. त्यामुळे कुशल गृहिणी, आदर्श माता आणि सर्वगुणसंपन्न पत्नी होण्याबरोबरच स्वतःसाठी जगणं आवश्यक आहे.

यासाठी प्रथम प्रत्येक महिलेने स्वतःचा दैनंदिन दिनक्रम, दररोजची दिवसभरातील घरातील, बाहेरील कामे, आठवड्यात पूर्ण करण्याची, महिन्याभरात पूर्ण करण्याची कामे याची सविस्तर यादी करावी. त्यातून घरातील, घराबाहेरील कामांचे वर्गीकरण करावे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले वैयक्तिक टाइमटेबल तयार करावे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा. प्रत्येक कामाला लागणारा वेळ निश्चित करावा. त्यातून आपल्यालाच लक्षात येईल की, आपण किती तास कुठे घालवतोय, आपला वेळ नेमका कुठे जातोय, वाया जाणारा, व्यर्थ जाणारा वेळ किती आहे आणि कशामुळे आहे. सुरुवातीला एक महिना असा प्रयोग करून पाहिल्यावर तुम्हालाच तुमच्या हाती स्वतःसाठी हक्काचा किती वेळ दररोज शिल्लक असतो, ते समजेल आणि त्यावेळचा सदुपयोग कसा करावा, याचे नियोजन करता येईल.

अनेक महिला दररोज वर्तमानपत्र वाचत नाहीत. टीव्हीवरील बातम्यादेखील पाहत नाहीत. अनेक महिलांना ड्रायव्हिंग येत नाही. त्यामुळे त्या कुठेही जाण्या-येण्यासाठी घरातील कोणावर तरी अवलंबून राहतात. त्यातून त्यांच्या बाहेर पडण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे बाह्य जगाशी त्यांचा संपर्क राहत नाही. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. रोजच्या कंटाळवाण्या जीवनशैलीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्या मैत्रिणींना भेटा. शेजाऱ्यांकडे जा. त्यांच्यासाठी वेळ काढा. नावाजलेली पुस्तके वाचा. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात, कार्यक्रमांत सहभागी व्हा. प्रदर्शन, उत्तम नाटके, उत्कृष्ट चित्रपट आवर्जून बघा. विविध कलाकारांचे कार्यक्रम, सर्व प्रकारचे सोहळे यांना उपस्थित राहायचा प्रयत्न करा. सकारात्मक, उत्साही लोकांमध्ये मिसळा. आपला परिसर, आपले शहर माहिती करून घ्या. आपण पुढे पाऊल टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही ओळखणार नाही. हे सर्व करायला सुरुवात केल्यावरच आपल्या लक्षात येईल. आपल्यात कमतरता काय आहेत. आपली कौशल्य काय आहेत. त्यातून स्वतःची जडणघडण साधणे शक्य होईल, मोकळा श्वास घेणे शक्य होईल.

घरातल्या लोकांना तुम्हाला गबाळं, अव्यवस्थित, अजागळ बघायची सवय होऊन जाते आणि मग तुम्हालाही त्यात काही वावगे वाटत नाही. घरातच तर असतो, मग काय नट्टा-पट्टा करून राहायचा. तर तसे नाही पण चोवीस तास घरासाठी झिजण्यासोबतच, स्वतःचे कपडे, स्वतःची स्वच्छता, राहणीमान, भाषा शैली, देह बोली, तब्बेत, स्वतःचे रुटीन मेडिकल चेकिंग, आहार-विहार, मानसिक आरोग्य याकडे आवर्जून लक्ष द्या. आपण स्वतःच स्वतःला बदलू शकतो, आपणच आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -