Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडी‘अटलजींच्या जयंतीदिनी भाजपतर्फे विविध कार्यक्रम’

‘अटलजींच्या जयंतीदिनी भाजपतर्फे विविध कार्यक्रम’

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याचेही भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.

भांडारी म्हणाले की, ‘अटलजी ते मोदीजी – सुशासनाचा प्रयास’ या विषयावर माजी मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर, अनिल घनवट, राजीव साने, दीपक करंजीकर आदींची व्याख्याने होणार आहेत. तसेच वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे. गेल्या ७ वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथ स्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत.

या खेरीज सर्व बुथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे जाहीर वाचन, महाविद्यालय परिसरात अटलजींच्या जीवनावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणाऱ्या भाजप लोकप्रतिनिधींचा ‘अटल पुरस्कार’ देऊन गौरव केला जाणार आहे, असेही भांडारी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -