Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीVasant More : राज ठाकरेंकडे माफी मागत वसंत मोरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'!

Vasant More : राज ठाकरेंकडे माफी मागत वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’!

‘या’ पक्षात करणार प्रवेश

मुंबई : मनसेचे (MNS) अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहित त्यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. त्याचबरोबर वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांनी आज सकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती, त्यानंतर दुपारी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला.

फेसबुक अकाऊंटवरुन केली निराशाजनक पोस्ट

आज सकाळी वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक निराशाजनक पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार कतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो…’. त्यांच्या या पोस्टवरुन मनसेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली. वसंत मोरे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या, ज्याला काही वेळातच पुष्टी मिळाली.

राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरे म्हणाले, मी लवकरच माझी भूमिका जाहीर करेन. अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. पक्षातील काही नेत्यांकडून त्रास होत होता. पुणे शहरात मी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक होतो. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत गोष्टी, वारंवार माझ्यावर होणारे आरोप, मी स्वतंत्र राजकारण करत असल्याचा आरोप होत होता. माझ्या वागणुकीवर आणि चरित्र्यावर आरोप केले जात होते. मी आता मनसे सोडली आहे. मी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी आता संघटेनेमध्ये नाही. माझी पुढील भूमिका पुणेकर ठरवतील, असंही ते पुढे बोलताना म्हणाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -