Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाIndia vs New Zealand : शेवटचा सामनाही पावसामुळे क्लीन बोल्ड!

India vs New Zealand : शेवटचा सामनाही पावसामुळे क्लीन बोल्ड!

एकदिवसीय मालिका वाचविण्यात भारताला अपयश

ख्रिस्टचर्च (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला लागलेले पावसाचे ग्रहण शेवटच्या सामन्यातही सुटले नाही. बुधवारी झालेला एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि मालिका वाचविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अखेर ब्रेक लागला.

भारताच्या गचाळ फलंदाजीमुळे हा सामना जवळपास न्यूझीलंडच्याच बाजूने झुकलेला होता. त्यात पावसाने व्यत्यय घातल्याने मालिका गमावल्याचे खापर पावसावर फोडण्याचा पर्याय तरी भारताकडे राहीला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतलेल्या किवींनी उर्वरित दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्याने १-० अशा फरकाने एकदिवसीय मालिका विजयाचा चषक आपल्याकडेच ठेवला.

न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-२० आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांमधील निम्म्यापेक्षा जास्त सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे टी-२० मालिका भारताने १-० अशी, तर एकदिवसीय मालिका यजमानांनी १-० अशी जिंकली. बुधवारी झालेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉशींग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर वगळता भारतीय फलंदाजांनी हाराकीरी केली.

शिखर धवन, शुबमन गील, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव या बिनीच्या शिलेदारांना धावा जमवण्यात सपशेल अपयश आले. त्याचा फटका प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला बसला. भारताचा संघ ४७.३ षटकांत २१९ धावांवर सर्वबाद झाला. वॉशींग्टन सुंदरने भारतातर्फे सर्वाधिक ५१ धावा जमवल्या, तर श्रेयस अय्यरने ४९ धावांची खेळी खेळली. भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यात अॅडम मिलने, डॅरेल मिचेल आघाडीवर होते. दोघांनीही प्रत्येकी ३ बळी मिळवत भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला. टीम साऊदीने २ मोहरे टिपले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या फिन अॅलेन आणि देवॉन कॉनवे यांनी चांगली सुरुवात करत संघाच्या विजयाचा पाया रचला. संघाची धावसंख्या ९७ असताना न्यूझीलंडला फिन अॅलेनच्या रुपाने पहिला धक्का बसला. कॉनवे आणि केन विल्यमसन खेळत असताना पावसाने हजेरी लावली. शेवटी पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे नसताना अखेर सामना रद्द करण्यात आला. न्यूझीलंडने १८ षटकांत एका फलंदाजाच्या बदल्यात १०४ धावा केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -