Sunday, April 28, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘जो खो गया मैं उसको भूलाता चला गया...’

‘जो खो गया मैं उसको भूलाता चला गया…’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

साहिर लुधियानवी यांची लेखणी म्हणजे एक धबधबा होता. धबधबा कसा? तर अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या ‘नायगारा’ धबधब्यासारखा! तिथे त्या अजस्त्र उंच धबधब्याच्या विशिष्ट रचनेमुळे दिवसभर प्रचंड मोठे तुषार उडत राहतात. त्यातून खूप मोठ्या भागावर इंद्रधनुष्य दिसत राहते. गंमत म्हणजे इथे इंद्रधनुष्य पाहण्यासाठी मान वर करून आकाशात पाहावे लागत नाही. ते दिसते चक्क जमिनीवर.

साहिरच्या लेखणीतूनही सतत तशीच सप्तरंगी उधळण होत राहायची. नवरसांपैकी कोणताही रस असो, कोणताही भाव असो, कोणताही प्रसंग असो, सगळे काही नेमक्या शब्दांत मांडणारी शायरी त्याच्या लेखणीतून आपोआपच पाझरायची!
सिनेमा होता १९६१ साली आलेला देव आनंदचा ‘हम दोनो’. कथा ताराशंकर बंडोपाध्याय यांच्या ‘उत्तरायण’ या बंगाली कादंबरीवर बेतलेली. बंगालीत त्याच नावाने आधीच एक सिनेमा आला होता. त्याशिवाय एन. टी. रामाराव यांनी याच कथेवर तेलुगूत ‘रामुनी मिंचीना रामुदू’ नावाचा सिनेमा काढला.

‘नवकेतन फिल्म्स’च्या ‘हम दोनो’चे दिग्दर्शक म्हणून जरी अमरजीत यांचे नाव लागले असले तरी देव आनंदचे म्हणणे होते की, सिनेमाचे दिग्दर्शन विजय आनंद यांनीच केले आहे. सिनेमात देवच्या दुहेरी भूमिकेसह त्याच्याबरोबर होते साधना शिवदासानी, नंदा, लीला चिटणीस, ललिता पवार, गजाजन जहागीरदार आणि राशीद खान. सिनेमा हिट झाला. देव आनंदला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेयर नामांकनही मिळाले आणि १९६२च्या ‘बर्लिन अांतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी’ दिग्दर्शक अमरजीत यांचे ‘गोल्डन बेयर’ पारितोषिकासाठी नामांकन झाले होते. अलीकडेच, बरोबर ५० वर्षांनी ४ फेब्रुवारी २०११ला सिनेमाची रंगीत आवृत्ती रिलीज झाली होती. जयदेव यांनी संगीत दिलेली सातही गाणी लोकप्रिय झाली!

हम दोनोची कथा गुंतागुंतीची होती. देव हा ‘आनंद’ नावाचा एक गरीब बेकार तरुण. त्याचे मिता (साधना) या श्रीमंत मुलीवर प्रेम असते. तिच्या वडिलांना (गजानन जहागीरदार) भेटायला देव जातो, त्याच वेळी त्याला नोकरीसाठी एक मुलाखतीचे पत्र आलेले असते. जेव्हा जहागीरदारांना कळते की, आनंद नोकरीचा कॉल सोडून त्यांच्याकडे मिताशी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेला आहे, ते स्वाभाविकपणेच चिडतात! ‘एक तर तू बेकार! त्यात तुला चालून आलेली नोकरीची संधी सोडून आधी लग्न करायला निघालास, म्हणजे तू अत्यंत बेजबाबदारही आहेस! अशा मुलाशी मी माझ्या मुलीचे लग्न करून देणार नाही.’ असे ते त्याला सुनावतात. तो निराश होऊन घरी परततो. मात्र या दोघांत काय झाले हे साधनाला माहीत नसते.

घरी परतत असताना आनंदला रस्त्यात सैन्यातील नोकरीची जाहिरात असलेले एक पोस्टर दिसते. तो लगेच अर्ज करतो. महायुद्धच सुरू झालेले असल्याने त्याला लगेच ती नोकरी मिळते. तो सैन्यात दाखल होतो. तिथे त्याची भेट मेजर वर्मांशी होते. ते दिसायला अगदी त्याच्यासारखे असतात. दरम्यान अचानक युद्धाचा भडका उडून त्या दोघांनाही युद्धभूमीवर जावे लागते. त्यात मेजर वर्मा युद्धात गायब होतात. ते मारले गेले असावेत, असे लक्षात येते.

त्यांची पत्नी रूमाला असलेल्या हृदयविकारामुळे आनंदला चक्क मेजर वर्मा म्हणून त्यांचा घरी अडकून पडावे लागते. यामुळे इकडे आनंदची प्रेयसी साधना आणि मेजर वर्मांची पत्नी रुमा यांचे अनेक गैरसमज होऊन कथा भावनिक गुंतागुंतीची बनत जाते. शेवटी मेजर हयात आहेत. मात्र युद्धात त्यांचा एक पाय गेला आहे, असे आनंदला कळते. नंतर सगळी गुंतागुंत एका मंदिरात सुटते आणि कथेचा शेवट सुखांत होतो.

आनंद सैन्यात गेल्यावर जंगलात असताना एकदा स्वत:शीच एक गाणे गुणगुणतानाचे एक दृश्य होते. गाण्याची पार्श्वभूमी मोठी नाट्यमय होती. देव आनंद जंगलात एका तळ्यात प्रतिबिंब बघताना त्याला क्षणभर साधना दिसते. लगेच ती अदृश्यही होते. सोबत काहीही साधने नसल्याने तो त्या पाण्यातच स्वत:चे प्रतिबिंब बघत दाढी उरकतो आणि सिगारेट पेटवून तिचे लांब झुरके घेताना मनाला विरंगुळा म्हणून गाऊ लागतो असा प्रसंग होता.

साहिरने त्या साध्या प्रसंगासाठीही जीवनाचे एक वेगळेच तत्त्वज्ञान मांडणारे सुंदर गीत लिहून दिले. रफीसाहेबांनी जयदेव यांच्या संगीत दिग्दर्शनात, एका वेगळ्याच कैफात गायलेल्या त्या प्रचंड लोकप्रिय गाण्याचे शब्द होते-

मैं ज़िन्दगीका साथ निभाता
चला गया,
हर फ़िक्रको धुएँमें उड़ाता
चला गया…

टोकाचा कलंदरपणा हे मनस्वी कवीचे, कलाकाराचे वैशिष्ट्यच असते. तसे ते साहिरचेही होते. जीवन आसुसून, मनस्वीपणे जगायचे आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न झुगारून देत आपला कलंदरपणा सुरूच ठेवायचा. पुढे त्यातून उद्भवणारे त्रास, वेदना, तुटलेपण स्वीकारत त्या अनिर्बंध जगण्याचे उघड समर्थन करत राहायचे हा बहुधा अशा लोकांचा स्वभावच बनून जातो.

ज्याचे घर तुटले आहे, प्रेयसी दुरावली आहे आणि जीवनाची एका दिवसाचीही शाश्वती नाही अशा सैनिकाला तरी दुसरे कोणते विचार दिलासा देऊ शकणार म्हणा! म्हणूनच साहिरने त्याची ती मन:स्थिती या गाण्यात अगदी सहज उभी केली होती. तो म्हणतो, आता माझ्या जीवनाच्या झालेल्या वाताहतीचा शोक करून काय उपयोग होणार आहे? मग मी त्या बरबादीचाच उत्सव साजरा करण्याचे ठरवून टाकले.

बरबादियोंका सोग मनाना
फ़जूल था,
बरबादियोंका जश्न मनाता
चला गया,
हर फ़िक्रको…

एकदा अनावश्यक चिंता करायचे सोडून दिले की मग जगण्याशी तडजोड करणे जमू लागते. जे मिळाले आहे तेच आपल्या नशिबात होते ‘त्यातच आनंद मानायला काय हरकत आहे?’ असा सुज्ञपणा अंगवळणी पडतो. ते हाती लागले नाही, जे गमावले ते मनातून पुसून टाकून मी पुढे जात राहिलो असे तो कलंदरपणे म्हणतो.

जो मिल गया उसीको
मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको
भुलाता चला गया…
हर फ़िक्रको…

आणि एक वेळ अशी आली की जिथे दु:ख आणि आनंद यातला फरकच मी नष्ट करून टाकला. मनाच्या त्या अवस्थेला मी जाणीवपूर्वक प्राप्त करून घेतल्यामुळे माझे सगळे जगणेच आनंदी बनून गेले. मी तर ते जगणे साजरेच करू लागलो.

ग़म और ख़ुशीमें
फ़र्क़ न महसूस हो जहाँ,
मैं दिलको उस मुक़ामपे
लाता चला गया…
मैं ज़िन्दगीका साथ…

अशी जुनी गाणी ऐकताना एक विलक्षण गोष्ट लक्षात येते. जाता जाता असंख्य विफल प्रेमाना, जीवनाच्या लढाईत अयशस्वी ठरलेल्या निराश योद्ध्यांना साहिरसारखे कवी केवढा आधार देऊन जातात. हे त्यांचे वैभव पाहिले की खरोखर कौतुक वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -