Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाहैदराबादचा निसटता विजय

हैदराबादचा निसटता विजय

मुंबईवर केवळ ३ धावांनी मात

मुंबई (प्रतिनिधी) : रोहित शर्मा, इशन किशनची धडाकेबाज सलामी आणि टीम डेविडच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईचा संघ हैदराबादविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र लयीत असलेला डेविड चुकीच्या वेळी धावचित झाल्याने मुंबईला पराभवाची चव चाखावी लागली. हैदराबादने हा सामना अवघ्या ३ धावांनी जिंकत गुणफलक वाढविले. राहुल त्रिपाठीची फलंदाजी आणि उम्रान मलिक, भुवनेश्वर कुमार यांची गोलंदाजी हैदराबादच्या विजयात मोलाची ठरली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मुंबईने दणक्यात सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशन किशन चांगलेच लयीत होते. दोन्ही सलामीवीरांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा यथेच्छ सामना केला. त्यामुळे मुंबईने नाबाद अर्धशतक झळकावले. मुंबईचे धावसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना रोहित शर्माच्या रुपाने हैदराबादने पहिला बळी मिळवला. वॉशिंग्टन सुंदरने हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर इशन किशनही फार काळ थांबला नाही. रोहितपाठोपाठ किशनही माघारी परतला. येथे हैदराबादच्या मदतीला वेगाचा बादशहा उम्रान मलिक धाऊन आला. मलिकने गर्गकरवी झेलबाद करत किशनला पॅवेलियनचा रस्ता दाखवला. रोहित आणि किशन दोघांसाठीही नशीबाने किंचीतशी मान वळवली. दोघेही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाले. रोहितने ४८ तर किशनने ४३ धावांची कामगिरी केली. दोन्ही धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावगतीचा वेग मंदावला.

डॅनियल सॅम्स आणि युवा खेळाडू तिलक वर्मा फार काळ मैदानात थांबले नाहीत. त्यानंतर टीम डेविडने फलंदाजीची सूत्रे हाती घेत हैदराबादच्या गोलंदाजांना तारे दाखवले. टी नटराजनच्या एका षटकात सलग तीन षटकार ठोकत टीम डेविडने मुंबईला विजयासमीप नेले. पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेविड धावचित झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. टीम डेविडने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १८ चेंडूंत ४६ धावांची तुफानी फलंदाजी केली. तळात रमणदीप सिंगने ६ चेंडूंत १४ धावा करत सामन्याचा रोमांच वाढवला. त्यामुळे विजयासमीप आलेल्या मुंबईच्या घशातून हैदराबादने विजयाचा घास हिरावून घेतला. हैदराबादने ३ धावांनी सामना जिंकला. हैदराबादच्या उम्रान मलिकने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने ३ षटकांत २४ धावा देत ३ बळी मिळवले.

तत्पूर्वी सलामीवीर प्रियम गर्गसह राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन या मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे हैदराबादने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १९३ धावांचा डोंगर उभारला. प्रियम गर्गने २६ चेंडूंत ४२ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ४४ चेंडूंत ७६ धावांचे योगदान दिले, तर निकोलस पूरनने २२ चेंडूंत ३८ धावा केल्या. मुंबईचा रमणदीप सिंग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकांमध्ये अवघ्या २० धावा देत ३ बळी मिळवले. मुंबईचे अन्य फलंदाज महागडे ठरले. त्यातल्या त्यात जसप्रीत बुमराने बरी गोलंदाजी केली. ४ षटकांत ३२ धावा देत १ बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -