नितीन कीर्तनेसह खन्ना, वसंत यांना दुहेरी मुकुट

मुंबई (प्रतिनिधी) : टेस्टली जीएसटीए एस २०० आयटीएफ मुंबई २०२१ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत आदित्य खन्ना, नितीन कीर्तने आणि मयूर वसंत यांनी दुहेरी मुकुट पटकावला. निखिल रावचे हे पहिले आयटीएफ जेतेपद पटकावले.

एल अँड टी म्युच्युअल फंडच्या सहकार्याने प्रॅक्टेनिस (अंधेरी, पश्चिम) येथे झालेल्या स्पर्धेत दुहेरीत ३५ वर्षांवरील गटात आदित्यने त्याचा सहकारी विपिन सिरपॉलसह अजाज सेल्वराज आणि रेवंत दत्ता जोडीवर ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात कीर्तनेने निखिल रावसह मुर्ती आणि भाटिया जोडीवर ६-१, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ५० वर्षांवरील गटात भूषण अकुत आणि निशित पांडे तसेच ६० वर्षांवरील गटात मयूर वसंत आणि राकेश कोहली जोडीने बाजी मारली.

एकेरीत ३५ वर्षांवरील अव्वल मानांकित आदित्यला संदीप पवारकडून पहिल्या सेटमध्ये थोडी चुरस लाभली. मात्र, ६-३, ६-० असा विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात पाचवा मानांकित नितीन कीर्तनेने एन. चौधरीला ६-१, ६-१ अशा फरकाने हरवले. ५० वर्षांवरील गटात नीलकांत डमरे, ६० वर्षांवरील माणेक एम., ७० वर्षांवरील गटात जी. कुमार विजेते ठरले.

महिला एकेरित डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य

महिला एकेरीत डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य ठरल्या. त्यांनी अंतिम फेरीत नाझनीन रहमानवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीत नाझनीन रहमानने प्रियंका मेहतासह ज्योत्स्ना पटेल आणि नेहा शाहवर ६-२, ६-४ अशी मात केली.

महाराष्ट्र बंदचा फज्जा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी प्रकरणाचे निमित्त घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंदचा पुरता फज्जा उडाला. अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दुकानदार व व्यावसायिकांना दमदाटी करून दुकाने बंद पाडली. त्यानंतर पोलिसांची भर पडली. अनेक ठिकाणी राज्य मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडून बंदचा आग्रह धरताना दिसले.

सोमवारी सकाळपासूनच मुंबईसह अनेक शहरांमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी बंद पाळण्यासाठी भाग पाडले. ठाण्यात तर शिवसैनिकांनी एका रिक्षाचालकालाही बेदम मारहाण केली. मुंबईत मालवणी परिसरात काही ठिकाणी बेस्टच्या बसवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलीस संरक्षण देत असतील तरच आपण बसगाड्या चालवू, असा इशारा देत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले.

राज्यात अनेक ठिकाणी शाळांना सुट्टीच जाहीर करण्यात आली. तशी सुट्टी जाहीर करावी म्हणून शाळांना सरकारकडून अघोषित आदेश दिले गेले होते, असे कळते. पोलीस बळाचाही तुफान वापर बंद यशस्वी करण्याच्या प्रयत्नात केला गेला.

ठाण्यात शिवसैनिकांच्या हाती काठ्या, उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण

लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सोमवारच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान ठाण्यात शिवसेनेची दादागिरी पाहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा – ‘आज वसूली चालू आहे की बंद?’

बंद यशस्वी करण्यासाठी सेना-राष्ट्रवादी उतरली. रस्त्यावर बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद केली. मात्र रिक्षाचालक प्रतिसाद देत नसल्याने टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रम भागात उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र बंद करण्यासाठी ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर जांभळी नाका ते स्टेशन परिसर, नौपाडा या भागात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद केली. तसेच रिक्षा चालकांना चोप देऊन रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे यामध्ये पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गाडीत टाकले आणि त्यांना मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील पोलिसांनी चित्रीकरण करण्यासाठी मज्जाव केला. एकूणच या बंदमध्ये सहभागी झालेल्या मोठे पदाधिकारी बाजूला राहिले असून अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांकडून चोप मिळाला.

हे सुद्धा वाचा -ठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

‘सत्ताधारी रस्त्यावर येऊन दादागिरीने रिक्षा व दुकाने बंद करतात, ही अत्यंत चुकीची पद्धत आहेत. शाखाप्रमुख, उपमहापौरांचे पती हे दादागिरीने रिक्षाचालकांवर काठी मारुन त्यांच्या काचा फोडतात. दुकानांचे शटर बंद करतात, हा कुठला कायदा? कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी पाळायची आहे. त्यांनीच कायदा हातात घेतला आहे, हे निषेधार्ह आहे, असे मत भाजपचे ठाण्यातील गटनेते मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

टीएमटी बंद असल्याने रिक्षासाठी मोठ्या रांगा

बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची (टीएमटी) बस सेवा बंद होती. त्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिक रिक्षाचा पर्याय वापरत होते. बसेस नसल्याने कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच रिक्षासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबईत अज्ञात व्यक्तींकडून आठ बेस्ट बसवर दगडफेक

महाराष्ट्र बंददरम्यान अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसचे नुकसान केलं आहे. त्यानंतर पोलीस संरक्षणाने मुंबईत बस चालवण्याची योजना हाती घेण्यात आली.

बेस्टच्या धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनऑर्बिट मालाड या परिसरातील बसेसची तोडफोड झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचे कळते. एकुण सात ठिकाणी बेस्ट बसेसचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट जनता संपर्क विभागाचे मनोज वऱ्हाडे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा – हा ‘शासकीय इतमामातील’ बंद : आशिष शेलार

काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

… हा तर सरकारी दहशतवाद : फडणवीस

आज महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकार ढोंगीपणा करते आहे. लखीमपूरसाठी बंद आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत नाही. राज्यात २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. ना कर्जमाफी, ना कोणती मदत. आजचा सारा प्रकार म्हणजे सरकारपुरस्कृत दहशतवाद आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे सुद्धा वाचा – महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध

या नेत्यांना शेतकऱ्यांची खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. सरकारने अनेक योजना बंद केल्या. अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खे सरकारच ‘बंद सरकार’ आहे.

आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलीसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे. मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी बंद, चंद्रकांत पाटील यांची टीका

राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम बंद घोषणा केली. नेहेमीप्रमाणे आघाडीतील इतर सर्वांना फरफटत जावे लागले. शिवसेनेलाही सत्ता टिकविण्यासाठी पवारांचे ऐकावे लागले, असा टोला त्यांनी हाणला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची व्यापार आघाडी न्यायालयात गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.

गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबारावेळी कुठे होतात? : दरेकर

गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? मावळला ज्यावेळी भयानक क्रूर पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून गोळीबार शेतकऱ्यांवर केला, त्यावेळा आपल्या संवेदना भावना कुठं होत्या? पालघरला साधुंचं हत्याकांड झालं, त्यावेळी दोन शब्दांचा आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला नाही, संप केला नाही, त्यावेळी आपल्या संवेदना कुठं होत्या, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

नवरात्रीतील नवरंग : पाचवा दिवस – पांढरा रंग

पांढरा रंग : पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

कन्झ्यूमर फॅसिलिटेशन सेंटर, भांडूप

ॲन्टॉप हिल आरोग्य सेविका

आम्ही साऱ्या सखी (भांडुप-पूर्व)

एमएसईडीसीएल वागले इस्टेट, ठाणे

एमकेट्टे ऍनालिस्टिक एलटीडी, ठाणे

क्लाऊडनाईन हॉस्पीटल, नवीमुंबई

घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी

ब्रीज कँडी हॉस्पीटल, फूड अँड बेवरेज टीम

भक्ती सागर को.आँप.हौ

भविष्य निर्वाह निधी भवन, बांद्रा-पूर्व

भिवंडी मनपा शाळा

महेंद्र गुरव आणि मित्रमंडळ, नालासोपारा

मेहता अँड मेहता मंगलम प्लेसमेंट

रेडिक्स, अंधेरी

लिलावती हॉस्पीटल

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत बंदचा बोजवारा

कणकवली ( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या बंदचा फज्जा उडाला. त्यामुळे शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना बाजारपेठेत फिरून दुकाने बंद करण्याची वेळ आली. कणकवलीत काही व्यापाऱ्यांना धमकावत दुकाने बंद केली. याबद्दल व्यापारी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

व्यापारी, दुकानदार दाद देत नाहीत, असे कळल्यानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर आपापल्या कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत फिरत दुकाने बंद करायला भाग पाडत होते. दुकाने बंद केली जात नसल्याने कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्यांना शिवीगाळ आणि दादागिरी करून काही दुकाने बंद केली.

हे सुद्धा वाचा – महाराष्ट्र बंदचा फज्जा

मात्र काही वेळाने दुकाने पुन्हा उघडली. महाराष्ट्र बंदला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि आपली दुकाने सुरुच राहतील असे सांगत दिवसभर दुकाने सताड उघडली. काही ठिकाणी सेनेच्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी बंदला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दादागिरी करत दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनीही बंद केलेली दुकानाची शटर पुन्हा वर करत दुकाने सुरू ठेवली.

तुमचे दुकान आधी बंद करा – कणकवलीत व्यापाऱ्याने आमदार नाईकांना सुनावले

तुमचे दुकान प्रथम बंद करा आणि मग आम्हाला दुकाने बंद करण्यास जबरदस्ती करा, असे कणकवलीतील एका व्यापाऱ्याने शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुनावले.

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर आमदारांना धुडकावून लावल्याने अनपेक्षित धक्का बसला. कणकवली मुख्य चौकात आर. बी. बेकरी बंद करून लगतच्या एका व्यापाऱ्याला तुझेही दुकान बंद कर, असे दरडावले.

तेव्हा त्या व्यापाऱ्याने, तुमचे नरडवे नाक्यावर लोखंड, स्टील, सिमेंट, पत्रे आदी वस्तू विकण्याचे दुकान सुरू आहे ते आधी बंद करा, मग आम्ही आमचे दुकान बंद करतो. कोरोनाच्या काळात सुद्धा तुमचे दुकान चालू होते, असे सुनावले.

कार्ड, अँग्रीस्ट आणि इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर

नवी दिल्ली : स्टॉकहोम येथील रॉयल स्विडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसकडून जाहीर करण्यात आलेला यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड कार्ड, जोशुआ डी. अंग्रीस्ट आणि गुईडो डब्ल्यू इम्बेन्स यांनी जिंकला आहे.

नोबेल समितीने या पुरस्काराचा अर्धा हिस्सा डेव्हिड कार्ड यांना श्रम अर्थशास्त्रात त्यांच्या प्रयोगशील योगदानासाठी दिला आहे. तर या पुरस्काराचा अर्धा हिस्सा संयुक्तरित्या अँग्रीस्ट आणि इम्बेन्स यांना त्यांच्या मेथेडोलॉजिकल योगदानासाठी दिला आहे.

महाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

मुंबई : लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे, त्याच दादरच्या मंडईत शेतमाल विकला गेला. सकाळी १० पर्यंत मंडईतील सर्व व्यवहार झाले. त्यामुळे दादरमध्ये शेतकरी आणि व्यापारांनी महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न दिल्याचे चित्र दिसले.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला बंदचे आवाहन केले. परंतु साेलापूरमध्ये पहाटे शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला आणि विकला. तसेच वाहतूकही सुरळीत सुरू होती. औरंगाबादसह राज्यातील अनेक मंडईत शेतमालाची विक्री करण्यात आली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला नाही.

साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे यांनी स्वत: दुचाकी चालवत पुकारलेला बंद धुडकारला. तसेच शिर्डीतील सर्व व्यवहारही सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे

हा ‘शासकीय इतमामातील’ बंद : आशिष शेलार

मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्र बंद जनतेवर लादला आहे. त्यामुळे हा ‘शासकीय इतमामातील’ बंद असून ठाकरे सरकारला जनताही अशाचप्रकारे ‘शासकीय इतमामात’ निरोप देईल, अशी टीका भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द खूप प्रिय आहेत. आणि याचा अनुभव महाराष्ट्राची जनता गेले पावणे दोन वर्ष घेत आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येऊन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे आणि यातच जनतेवर बंद लादण्यात आला.

हे सुद्धा वाचा – ‘आज वसूली चालू आहे की बंद?’

जनतेचा महाराष्ट्र बंदला विरोध होता, परंतु शासकीय अधिकारी जनतेच्या मनात भिती निर्माण करत होते, तर बेस्टचे महाव्यवस्थापक बंद यशस्वी होण्याच्या कामाला लागले होते. जनतेच्या मनात भिती निर्माण करून महाराष्ट्र बंद लादण्यात आल्यामुळे हा बंद ‘शासकीय इतमामातील’ बंद असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

ठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

ठाणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. दरम्यान, ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावरच मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.

ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एकप्रकारे दादागिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आला. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा बंद ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर रिक्षाचालकांना दमदाटी करत, मारहाण केल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र बंद असल्याने टीएमटी बससेवा बंद आहे, परिणामी नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागत आहे. परंतु, शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षाचालकांमध्येही दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

ठाण्यामधील जांभळीनाका परिसरात हा प्रकार घडला. या ठिकाणी अनेक शिवसैनिक काठीने रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षाचालकांना मारहाण करत होते व रिक्षा बंद करा, असे धमकावत होते. याशिवाय काही जणांच्या टोळक्याने शहरात फिरुन जी दुकानं उघडी होती ती बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये शिवसैनिक घुसले होते व दुकान बंद करण्यास भाग पाडले. एकुणच ठाण्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करून हा बंद पाळण्यास भाग पाडला जात असल्याचे निदर्शनास आले. शिवसैनिकांच्या या कृतीचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरात घट

मुंबई (प्रतिनिधी) : देशाचं सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून आपला रेपो लिंक्ड व्याजदर हा ६.९० वरून ६.८० टक्के म्हणजेच १० बेसिस पॉइंटने घट केली आहे. बँकेकडून गृहकर्ज, चारचाकी वाहन, शैक्षणिक, व्यक्तिगत कर्ज तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ह्या घटलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल.

त्याच प्रमाणे एमसीएलआरमध्ये सुद्धा १० बेसिस पॉइंटने घट करून तो ६.७० टक्के करण्यात आला आहे. एक दिवसासाठी तो ६.७० टक्के, एक महिना मुदतीसाठी ६.८० टक्के, ३ महिन्यांसाठी ७.१० टक्के आणि ६ महिने मुदतीसाठी ७.१५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे. एक वर्ष मुदतीसाठी सुद्धा एम सी एल आर ५ बेसिस पॉइंटने ७.२५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे.

तत्पूर्वी सणासुदीच्या कालावधितील आनंदात भर घालण्यासाठी बँकेने गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज यावरील प्रक्रिया शुल्क बँकेने माफ केले आहे. आता आरएलएलआर मध्ये घट केल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर हा ६.८० टक्के, चारचाकी वाहन कर्जाचा व्याजदर ७.०५ टक्के व सोने तारण कर्जाचा व्याजदर ७.०० टक्के झाला असून तो सर्वांना परवडेल असा व्याजदर आहे.

“आरएलएलआरमध्ये घट केल्यामुळे आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज घेणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना ती कर्जे घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व यावर्षीचा त्यांचा सणांचा आणि उत्सवांचा उत्साह द्विगुणीत होईल “ असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी व्यक्त केला.

जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये चकमकीत पाच जवान शहीद

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये आज दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह ४ सैनिकांचा समावेश आहे. पुंछ भागातील सर्व परिसर सील करण्यात आला असून तेथे दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

पुंछमधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाने त्या भागात सैन्य तैनात करून शोध मोहिम सुरू केली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ५ सैनिकांवर गोळीबार केला. सैनिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अर्ध्या रस्त्यातच त्यांनी अखरेचा श्वास घेतला.