मुंबई (प्रतिनिधी) : देशाचं सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ पासून आपला रेपो लिंक्ड व्याजदर हा ६.९० वरून ६.८० टक्के म्हणजेच १० बेसिस पॉइंटने घट केली आहे. बँकेकडून गृहकर्ज, चारचाकी वाहन, शैक्षणिक, व्यक्तिगत कर्ज तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ह्या घटलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल.
त्याच प्रमाणे एमसीएलआरमध्ये सुद्धा १० बेसिस पॉइंटने घट करून तो ६.७० टक्के करण्यात आला आहे. एक दिवसासाठी तो ६.७० टक्के, एक महिना मुदतीसाठी ६.८० टक्के, ३ महिन्यांसाठी ७.१० टक्के आणि ६ महिने मुदतीसाठी ७.१५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे. एक वर्ष मुदतीसाठी सुद्धा एम सी एल आर ५ बेसिस पॉइंटने ७.२५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी सणासुदीच्या कालावधितील आनंदात भर घालण्यासाठी बँकेने गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज यावरील प्रक्रिया शुल्क बँकेने माफ केले आहे. आता आरएलएलआर मध्ये घट केल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर हा ६.८० टक्के, चारचाकी वाहन कर्जाचा व्याजदर ७.०५ टक्के व सोने तारण कर्जाचा व्याजदर ७.०० टक्के झाला असून तो सर्वांना परवडेल असा व्याजदर आहे.
“आरएलएलआरमध्ये घट केल्यामुळे आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज घेणाऱ्या बँकेच्या ग्राहकांना ती कर्जे घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व यावर्षीचा त्यांचा सणांचा आणि उत्सवांचा उत्साह द्विगुणीत होईल “ असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी व्यक्त केला.