मुंबई (प्रतिनिधी) : टेस्टली जीएसटीए एस २०० आयटीएफ मुंबई २०२१ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत आदित्य खन्ना, नितीन कीर्तने आणि मयूर वसंत यांनी दुहेरी मुकुट पटकावला. निखिल रावचे हे पहिले आयटीएफ जेतेपद पटकावले.
एल अँड टी म्युच्युअल फंडच्या सहकार्याने प्रॅक्टेनिस (अंधेरी, पश्चिम) येथे झालेल्या स्पर्धेत दुहेरीत ३५ वर्षांवरील गटात आदित्यने त्याचा सहकारी विपिन सिरपॉलसह अजाज सेल्वराज आणि रेवंत दत्ता जोडीवर ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात कीर्तनेने निखिल रावसह मुर्ती आणि भाटिया जोडीवर ६-१, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ५० वर्षांवरील गटात भूषण अकुत आणि निशित पांडे तसेच ६० वर्षांवरील गटात मयूर वसंत आणि राकेश कोहली जोडीने बाजी मारली.
एकेरीत ३५ वर्षांवरील अव्वल मानांकित आदित्यला संदीप पवारकडून पहिल्या सेटमध्ये थोडी चुरस लाभली. मात्र, ६-३, ६-० असा विजय मिळवला. ४० वर्षांवरील गटात पाचवा मानांकित नितीन कीर्तनेने एन. चौधरीला ६-१, ६-१ अशा फरकाने हरवले. ५० वर्षांवरील गटात नीलकांत डमरे, ६० वर्षांवरील माणेक एम., ७० वर्षांवरील गटात जी. कुमार विजेते ठरले.
महिला एकेरित डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य
महिला एकेरीत डॉ. ज्योत्स्ना पटेल अजिंक्य ठरल्या. त्यांनी अंतिम फेरीत नाझनीन रहमानवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीत नाझनीन रहमानने प्रियंका मेहतासह ज्योत्स्ना पटेल आणि नेहा शाहवर ६-२, ६-४ अशी मात केली.