गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीं यांच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला.

एका वेगळ्या विचारधारेनं प्रभावित गट वीर सावरकर यांच्या आयुष्य आणि विचारधारेशी अपरिचित आहे. त्यांना याची योग्य समज नाही आणि त्यामुळेच ते प्रश्न विचारत राहतात. विचारधारेच्या चष्म्यातून पाहिलं तर वीर सावरकर यांच्या योगदानाची उपेक्षा करणं आणि त्यांना अपमानित करणं क्षमा योग्य आणि न्यायसंगत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. उदय माहूरकर आणि चिरायु पंडित लिखित ‘वीर सावरकर हू कूड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, सावरकरांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील’ अशी गांधींनी म्हटल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती, पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, अशी ही मदत राहील. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

कलाकारांना अर्थसहाय्य

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यांची मागणी विचारात घेऊन राज्यातील प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या ५६,००० एकल कलावंतांना रुपये ५ हजार प्रति कलाकारप्रमाणे रुपये २८ कोटी व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ८४७ संस्थांना रुपये ६ कोटी  असे एकूण रुपये ३४ कोटी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. स्थानिक लोककलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रशासकीय खर्च १ कोटीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान, मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (एनएपीडीडीएआर) ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. ही योजना २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार

मुंबई : राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालयाचे दार विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता महाविद्यालये सुरू होत असून विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना नियम व अटी पाळणे आवश्यक असणार आहे.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सेल्फ फायनान्स विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. मात्र ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करूनच विद्यापीठ स्तरावर घ्यावा, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीनिशी कॉलेज सुरू करायचे असल्यास स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सांगताना मुंबईची महाविद्यालये सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आम्ही मुख्य सचिवांना पाठवला आहे, असे सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असून विद्यार्थ्य़ांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. महाविद्यालये सुरू करण्यासाठी कोरोना परिस्थिती पाहून त्या त्या जिह्याची वेगवेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाचा एक डोस किंवा लसीकरणच झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात हजर राहता येणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय महाविद्यालयाने करावी असे सामंत म्हणाले. कोरोना प्रादुर्भाव पाहता महाविद्यालये सुरू ठेवण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापिठ्यांना देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

भारतीय जवान पाकिस्तानला पाठवत होता गुप्त माहिती

जोधपूर : भारताच्या लष्करी जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशातील महत्त्वाची माहिती मिळवण्याचे काम ‘आयएसआय’ या पाकिस्तानी एजन्सीच्या महिला करत आहेत. अशातच जोधपूर मिलिटरी इंजिनीअरींग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह हे या महिलेच्या जाळ्यात अडकले. आणि सीमेपलीकडील पाकिस्तानी महिलांना देशाच्या सुरक्षेची गोपनीय माहिती पाठवण्यास सुरुवात केली. याप्रकरणी राम सिंगला अटक झाली असून त्याची चौकशी होत आहे तसेच जयपुरमधील गुप्तचर संस्थांकडून पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर लक्ष ठेवून आहे. गेले तीन महिने राम सिंग व्हॉट्सऍपद्वारे देशाची गोपनीय आणि धोरणात्मक माहिती सीमेपलीकडील आयएसआय या पाकिस्तानी संस्थेला पाठवत होता.

प्राथमिक चौकशीत रामसिंगच्या फोनमधून देशहितासंबंधी अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाल्याचे समोर आले. तपासादरम्यान, त्याच्या फोनमध्ये सीमेपलीकडे पाठवलेली भारतीय लष्करांच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली. अद्याप गुप्तचर संस्थेकडून राम सिंगचा तपास सुरू असल्याचे सुत्रांनुसार कळले आहे.

टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): बीसीसीआयच्या आयोजनाखाली ओमानसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या भारताच्या संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण झाले.

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. या फोटोला, बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहे. जर्सीचा नमुना टीम इंडियाच्या कोट्यवधी चाहत्यांनी प्रेरित केला आहे. या जर्सीचा रंग गडद निळा आहे, असे कॅप्शन देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या ट्विटरवरील फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे.

रोहितची ‘ती’ कृती कौतुकास्पद

भारताच्या क्रिकेटपटूंचा नव्या जर्सीसोबतचा फोटो व्हायरल होताच, त्यात असलेला रोहित शर्मा जास्त चर्चेत आला आहे. त्याची एक कृती कौतुकास्पद ठरली आहे. फोटोंमधील विराट, जडेजास बुमराने त्यांचे बोट बीसीसीआयच्या लोगोकडे तर रोहितने आपले बोट इंडिया या शब्दाकडे दाखवले.

भारताने आयोजित केलेला टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाईल. विराट कोहली आणि सहकाऱ्यांची वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने होईल. यानंतर भारताचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, ३ नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा तिसरा सामना असेल.

धोनीचा एक सल्ला सामन्याचा निकाल बदलू शकतो : मदन लाल

आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी मेंटॉर म्हणून निवडण्यात आलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. धोनीचा एक सल्ला सामन्याचा निकाल पालटू शकतो, असे मदनलाल यांनी म्हटले आहे.

मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंह धोनीची निवड करणे खरंच चांगली बाब आहे. त्याने देशासाठी खूप काही केलं आहे. आता अनेक खेळाडू पैशांशिवाय बोलतच नाहीत. यासाठी मी धोनीचे धन्यवाद मानतो. त्याचा हा निर्णय योग्य आहे आणि बीसीसीआयने त्याला संधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मार्गदर्शक छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. छोटी चूकही लक्षात आल्यानंतर सामन्याचे रूपडे पालटू शकतो. धोनीजवळ चांगला अनुभव आहे. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्याने कठीण प्रसंगात संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याला माहिती आहे संघाला कशाप्रकारे हाताळायचे, असे मदन लाल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पंढरपूर : पंढरपूर येथील एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

दशरथ गिड्डे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. मूळचे मोहोळ येथील असलेले गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात संगमनेरमधील एसटी चालकाची आत्महत्या

अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते. चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधील संगमनेर बस डेपो येथे पहाटेच्या सुमारास एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवले.

एसटी चालक सुभाष तेलोरे हे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावातील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं.

धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

त्याआधी ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केले होते.

हे सुद्धा वाचा….

वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचा-याची आत्महत्या

दोन महिने पगार नसल्याने एसटी कर्मचा-याची आत्महत्या

कुर्ल्यातील आगीत २० दुचाकी जळून खाक

मुंबई : कुर्ला पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळच्या नेहरूनगर परिसरातील धम्म सोसायटीत बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या १८ वॉटर टँकर आणि १६ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. आगीच्या झळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग लावण्यात आल्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहे.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती.

साथीच्या आजारांचा धोका वाढतोय!

ऑक्टोबरच्या १० दिवसांत चिकनगुनीयाचे १५ रुग्ण

सीमा दाते

मुंबई : मुंबई महापालिका कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून आधीच चिंतेत आहे. त्यातच आता मुंबईत मलेरिया, डेंग्यू पाठोपाठ चिकनगुनीया फोफावताना पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाच्या एकाही रुग्णाची मुंबईत नोंद झाली नव्हती; मात्र यावर्षी केवळ ऑक्टोबरच्या १० दिवसांत १५ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढलेली असताना आता मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनीया यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाचा एकही रुग्ण मुंबईत नव्हता. असे असताना यावर्षी २०२१ मध्ये ऑक्टोबरच्या केवळ १० दिवसांत १५ चिकनगुनीयाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील केवळ दहा दिवसांत जास्त आहेत. मलेरियाचे रुग्ण ऑक्टोबरच्या दहा दिवसांत १६९ तर डेंग्यूचे ९७ रुग्ण आहेत.

दरवर्षी सप्टेंबरनंतर मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारात वाढ होताना पहायला मिळते. त्याच प्रमाणे यंदाही तशीच रुग्ण संख्या आहे. मात्र दोन वर्षांपासून मुंबईतून हद्दपार झालेला चिकनगुनीया मात्र यावर्षी डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईत साथीच्या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्यावर्षी २०२० मध्ये मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी केवळ दहा महिन्यांत ४१७२ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी २०२० मध्ये १२९ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर यावर्षी १० महिन्यांत ५७३ रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान मुंबई महापालिकेने साथीच्या आजारांसंदर्भात पूर्वनियोजन केले असले तरी मुंबईकरांना स्वच्छता पाळा, पावसाचे पाणी साठू देऊ नका, जिथे डास होतील ती जागा साफ ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः चिकनगुनीया पासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही लोकांना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात मंगळवारी मोदी यांनी मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, अशा घटनांवरून आरोप किंवा टीका करणाऱ्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला.

मानवाधिकाराची आपापल्या पद्धतीने व्याख्या

देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरून मानवाधिकारांचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो.मानवाधिकारांशी संबंधित आणखी बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करू लागले आहेत. एक प्रकारच्या घटनेत काही लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसते. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसत नाही. या प्रकारची मानसिकता देखील मानवाधिकारासाठी धोकादायक आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

राजकीय दृष्टीने पाहिल्यास मानवाधिकारांचे उल्लंघन

मानवाधिकाराचेउल्लंघन तेव्हा होते, जेव्हा त्याला राजकीय दृष्टीने पाहिलं जातं. राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. राजकीय फायदा-तोट्याच्या दृष्टीने पाहिले जाते. अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीसाठी नुकसानकारक आहे. असेच सोयीनुसार वर्तन ठेवणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून देशाला सावध राहायला हवे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाचा दाखला

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचा देखील दाखला दिला. महात्मा गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्वावर आधारलेल्या चळवळीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे जगभरातले लोक बापूंकडे मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहतात, असे मोदी म्हणाले.

मानवाधिकार या मूलभूत तत्वासाठी देखील काम करत राहणार

याआधी अनेकदा इतिहासात जेव्हा जग चुकीच्या दिशेने भरकटलं असताना देखील भारत मात्र मानवाधिकाराच्या मार्गाशी बांधील राहिला आहे. भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्त्वाला अनुसरून पुढे जात राहणार आहे. या मार्गात सर्वांसाठी मानवाधिकार या मूलभूत तत्वासाठी देखील भारत काम करत राहणार आहे, असेही मोदींनी यावेळी नमूद केले.

वीजटंचाईबाबत पंतप्रधान घेणार आढावा

देशात कोळशाच्या संभाव्य टंचाईची चर्चा आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आढावा घेणार आहेत.यासंदर्भात सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अमित शाह यांनी देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. मात्र, काही राज्यांनी याआधीच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.

अमित शहा यांच्यामुळेच जम्मू -काश्मीरमध्ये नवे युग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, असे वक्तव्य देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात मिश्रा यांनी वरील उद्गार काढले. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) २८व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या न्यायमूर्ती मिश्रा यांनी, जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याबद्दल आणि राज्यंना दोन केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिल्याबद्दल मिश्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाच्या तरी सांगण्यावरून भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणं हे आदर्शवादाचं प्रतीक झालंय, अशी टीकाही त्यांनी केली.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. राणे यांनी ठामपणे बजावले की, त्यांना या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ अपेक्षित असून त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा, असेही ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) गाठणे शक्य होईल, याकडे राणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर नवी दिल्ली येथे सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री राणे यांच्यासह केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के. सुरेश आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळवण्यात येत असलेल्या विविध कमतरता भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. परिणामी, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) या मिनी-रत्न महामंडळाची १०० टक्के उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. एआयएफ नियमांच्या अंतर्गत परवानगी असलेल्या इक्विटी, क्वासी-इक्विटी आणि डेट यांच्या माध्यमातून ईमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि १०,००६ कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने एसआरआय निधी अर्थात आत्मनिर्भर निधीची स्थापना करण्यात आली. यासाठी एसबीआयसीएपी व्हेंचर्स मर्या (एसव्हीएल) या कंपनीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली असून एनव्हीसीएफएलची कायदेविषयक सल्लगार म्हणून खेतान आणि कंपनी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एनव्हीसीएफएलने ठेवी आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) खासगी प्लेसमेंट मेमोरँडम सादर केले असून त्यायोगे १ सप्टेंबर २०२१ रोजी सेबीने एसआरआय निधीची दुसऱ्या श्रेणीच्या पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी केली.

एसआरआय निधी एमएसएमई क्षेत्रापुढील इक्विटी निधीच्या आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल आणि या उद्योगांना त्यांच्या पुढील अडचणी पार करण्यासाठी आवश्यक क्षमता देईल, कॉर्पोरेटायझेशनला प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या संपूर्ण पायाभूत क्षमतांसह जागतिक दर्जाचे विजेते म्हणून विकास पावण्यासाठी बळ देईल. सरकारी हस्तक्षेपासह हा निधी कमी प्रमाणात निधी मिळालेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे विविध प्रकारच्या निधींचे सुरळीत मार्गीकरण करेल आणि टिकाऊ व उच्च विकास क्षमता असणाऱ्या एमएसएमई उद्योगांच्या वाढीच्या समस्यांमध्ये मदत करेल.