मुंबई : कुर्ला पूर्व भागात रेल्वे स्थानकाजवळच्या नेहरूनगर परिसरातील धम्म सोसायटीत बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या १८ वॉटर टँकर आणि १६ गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग विझवली. आगीच्या झळा इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. ही आग लावण्यात आल्याची शक्यता रहिवाशांनी वर्तवली आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० बाईक पूर्णपणे जळून खाक झाल्या. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती.