मुंबई : राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालयाचे दार विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता महाविद्यालये सुरू होत असून विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना नियम व अटी पाळणे आवश्यक असणार आहे.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सेल्फ फायनान्स विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. मात्र ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करूनच विद्यापीठ स्तरावर घ्यावा, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीनिशी कॉलेज सुरू करायचे असल्यास स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सांगताना मुंबईची महाविद्यालये सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आम्ही मुख्य सचिवांना पाठवला आहे, असे सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले, २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असून विद्यार्थ्य़ांना कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. महाविद्यालये सुरू करण्यासाठी कोरोना परिस्थिती पाहून त्या त्या जिह्याची वेगवेगळी नियमावली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरणाचा एक डोस किंवा लसीकरणच झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात हजर राहता येणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय महाविद्यालयाने करावी असे सामंत म्हणाले. कोरोना प्रादुर्भाव पाहता महाविद्यालये सुरू ठेवण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापिठ्यांना देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.