नवी दिल्ली (वृत्तसंस्था): बीसीसीआयच्या आयोजनाखाली ओमानसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठीच्या भारताच्या संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण झाले.
बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. या फोटोला, बिलियन चीयर्स जर्सी सादर करत आहे. जर्सीचा नमुना टीम इंडियाच्या कोट्यवधी चाहत्यांनी प्रेरित केला आहे. या जर्सीचा रंग गडद निळा आहे, असे कॅप्शन देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या ट्विटरवरील फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे.
रोहितची ‘ती’ कृती कौतुकास्पद
भारताच्या क्रिकेटपटूंचा नव्या जर्सीसोबतचा फोटो व्हायरल होताच, त्यात असलेला रोहित शर्मा जास्त चर्चेत आला आहे. त्याची एक कृती कौतुकास्पद ठरली आहे. फोटोंमधील विराट, जडेजास बुमराने त्यांचे बोट बीसीसीआयच्या लोगोकडे तर रोहितने आपले बोट इंडिया या शब्दाकडे दाखवले.
भारताने आयोजित केलेला टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाईल. विराट कोहली आणि सहकाऱ्यांची वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने होईल. यानंतर भारताचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, ३ नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा तिसरा सामना असेल.
धोनीचा एक सल्ला सामन्याचा निकाल बदलू शकतो : मदन लाल
आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी मेंटॉर म्हणून निवडण्यात आलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. धोनीचा एक सल्ला सामन्याचा निकाल पालटू शकतो, असे मदनलाल यांनी म्हटले आहे.
मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंह धोनीची निवड करणे खरंच चांगली बाब आहे. त्याने देशासाठी खूप काही केलं आहे. आता अनेक खेळाडू पैशांशिवाय बोलतच नाहीत. यासाठी मी धोनीचे धन्यवाद मानतो. त्याचा हा निर्णय योग्य आहे आणि बीसीसीआयने त्याला संधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मार्गदर्शक छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. छोटी चूकही लक्षात आल्यानंतर सामन्याचे रूपडे पालटू शकतो. धोनीजवळ चांगला अनुभव आहे. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्याने कठीण प्रसंगात संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याला माहिती आहे संघाला कशाप्रकारे हाताळायचे, असे मदन लाल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.