मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती, पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, अशी ही मदत राहील. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
कलाकारांना अर्थसहाय्य
कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यांची मागणी विचारात घेऊन राज्यातील प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या ५६,००० एकल कलावंतांना रुपये ५ हजार प्रति कलाकारप्रमाणे रुपये २८ कोटी व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील ८४७ संस्थांना रुपये ६ कोटी असे एकूण रुपये ३४ कोटी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. स्थानिक लोककलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रशासकीय खर्च १ कोटीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान, मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (एनएपीडीडीएआर) ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. ही योजना २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.