सावित्री – गांधारी पुलावर पथदिव्यांचा अभाव

महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २०१६ रोजी झालेल्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी लोकार्पणप्रसंगी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षिततेच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांपासून सदरील पुलावरील पथदिवे बंद असून त्याकडे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लार्सन टुब्रो कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये नव्या गांधारी व सावित्री नदीवरील पुलावर पथदिवे आजपावेतो उभे करण्यात आलेले नाही. २ ऑगस्ट २०१६ रोजी सावित्री पूल दुर्घटनेनंतर केवळ १८० दिवसांमध्ये त्याच ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करून तो जनतेला लोकार्पण करताना रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा अपघात असल्याने यापासून बोध म्हणून नदीवरील पुलावर पथदिवे व कॅटआइज लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर संबंधित पुलांवर पहिल्या दोन वर्षांकरिता हे पथदिवे सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून या पथदिव्यांची बिले वेळेवर भरली न गेल्याने दोन ते तीनवेळा महावितरण विभागाने येथील कनेक्शन तोडले होते. गेल्या पाच वर्षात पुलावरील पथदिव्यांच्या बाबतीत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आगामी गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भाविकांचा वाढता राबता पाहता सदरील पुलावर पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्याशी जोडणार गाव पाड्यातील रस्ते : डॉ. विजयकुमार गावित

विरार (प्रतिनिधी) : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते वापरण्यायोग्य राहत नाहीत, अशा गाव पाड्यात पक्के रस्ते तयार करुन हे रस्ते मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनावने, सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयुषी सिंह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, दुर्गम भागातील ग्रामस्थामध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी आशा सेविका घरोघरी जाऊन आरोग्याविषयी माहिती देणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील समस्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करणाच्या सुचना दिल्या असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल या उपक्रमामध्ये गाव, पाड्यातील प्रत्येक घरात ५५ लिटर शुध्द पाणी मिळण्यासाठी पाणी शुध्दीकरण प्रकल्प स्थापन करण्यात येईल, असेही डॉ. गावित यांनी सांगितले.

डहाणूकरिता नवीन लोकल फेरी सुरू करा; प्रवाशांकडून रेल्वेच्या डीआरएमला निवेदन

सफाळे (वार्ताहर) : पश्चिम रेल्वेचे डीआरएम जी. सत्यप्रकाश हे एका कार्यक्रमानिमित्त डाहाणू येथे आले असता, रेल्वे प्रवाशांच्यावतीने डहाणूसाठी नवीन लोकल फेरी सुरु करावी, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. ते खासदार राजेंद्र गावित यांच्या बरोबर शनिवारी केळवे येथे दौऱ्यावर आले होते.

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावरून संध्याकाळी ६ ते ७:१० या १ तासापेक्षा अधिकच्या वेळेत डहाणू करीता लोकल उपलब्ध नसल्याने दोन्ही लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. डहाणू विरार लोकल सेवा सुरू होऊन ९ वर्षाचा काळ उलटला तरी डहाणू विरार लोकल फेऱ्या मध्ये वाढ मात्र झाली नाही. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईकडून डहाणूकडे येणाऱ्या लोकल मध्ये १ तासापेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी विरार डहाणू लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या मध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.

त्याअनुषंगाने गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई कडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबई कडून येणाऱ्या लोकल फे-यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीने डीआरएम यांच्याकडे करण्यात आली. तसेच पालघर भागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून या भागातील रेल्वे समस्या सोडवण्याची मागणी डीआरयुसीसी सदस्य केदार काळे यांनी डीआरएम आणि खासदार यांच्याकडे केली.

तसेच डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकात असलेल्या विविध समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची मागणी खासदार गावित यांनी डीआरएम यांच्याकडे यावेळी केली. करोना काळात बंद करण्यात आलेली सकाळची डहाणू – विरार लोकल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डीआरएम यांनी सांगितले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजा ठाकूर, यतीन सावे आणि प्रवासी उपस्थित होते.

डहाणूत तापाच्या आजाराने रुग्ण फणफणले

डहाणू : कोरोना महामारी संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पावसाळ्याच्या दिवसात अन्य संसर्गजन्य आजाराच्या रुग्णसंखेत झपाटाने वाढ होताना दिसत आहे, यात ताप, सर्दी, खोकला, याचे सर्वाधिक रुग्ण निरनिराळ्या खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने, हवेतील दमटपणा कायम राहून, हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईनफ्लू, इत्यादी संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. तापाच्या आजाराने बंदरपट्टी भागातील वरोर, वाढवण, वासगाव, चिंचणी, धाकटीडहाणू, बाडापोखरण, परिसरात अनेक रुग्ण फणफणले आहेत. एका महिन्याभरापूर्वी चिंचणी येथे डेंग्यू चा रुग्ण आढळून आला होता, असे सांगण्यात आले.

सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा रुग्णांचा कल अधिक असल्याने रुग्णाच्या आजाराची नोंद मिळू शकत नाही. त्यातच सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. त्यातच भर म्हणजे काही गरीब लोक कुजलेले मासे सडका भाजीपाला आणि दूषित पाणी पिल्याने संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती आहे.

युनिफॉर्म नसले तरी तुम्ही देखिल पोलिसच आहात; पोलीस अधिकारी नीता पाडवी

बोईसर (वार्ताहर) : युनिफॉर्म नसले तरी तुम्ही देखिल एक प्रकारे पोलिसच आहात. अपुऱ्या पोलीस बळामुळे तुम्हालाच गणेशोत्सव साजरा करतांना दक्षता घ्यावयाची आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असला तरीही गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वयंनियमनासह कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी व्यक्त केले.

महामार्गावरील सायलेंट हॉटेलमध्ये शनिवारी मनोर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी गणेशोत्सवा संदर्भात मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. गेल्या दोन वर्षांच्या काळात आपली अदृश्य आजारा सोबत आपली लढाई सुरू होती. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक निर्बंध लादण्यात आले होते.

भावपूर्ण वातावरणात कोणताही अनूचित प्रकार न होता सण साजरा होईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी केले. सामाजिक आरोग्य राखण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर टाळावा आणि आवाज कमी ठेवावा, मिरवणुकीत लेझीम आणि ढोल पथक सारखी पारंपरिक वाद्ये वाजवावी, मंडळांची नोंदणी करावी अन्यथा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कलम १४९ नुसार नोटीस देण्यात येईल.

विसर्जन स्थळी काळजी घ्यावी, स्थानिक प्रशासनाने विसर्जन स्थळी लाइफ गार्ड ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. मनोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ७५ गावे ६९ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध असल्याने कामात मर्यादा पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक दक्ष नागरिक स्वतः ला पोलीस समजूनच शिस्त पाळावी आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पडवी यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव घटल्याने राज्य सरकारच्या वतीने गणेशोत्सवा वरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या सूचनांची माहिती गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या. व्यापारी आणि दुकानदारांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती प्रतिभा गुरोडा, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान उपस्थित पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, राजकीय नेते, व्यापारी, नागरिकांच्या समस्या व सूचनांना कसबे यांनी ऐकून घेतले. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी मनोर शहरातील वाहतून नियमन केले जाणार आहे. मनोर बाजारपेठेतील रस्त्यालगतच्या गटारांवर थाटलेली दुकाने आणि फेरीवाले ग्रामपंचायत प्रशासनाला सोबत घेऊन कारवाई करून हटवले जातील, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रवासी रिक्षांचे नियमन केले जाणार असल्याचे कसबे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये ३० हजारांची लाच घेतांना पोलीस शिपायास अटक

नाशिक : नाशिक ग्रामीण हद्दीतील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत ३० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाला अटक करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरता ३० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपाई असलाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचून अटक करण्यात आले आहे.

जायखेडा पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक न करण्याकरता पोलीस शिपाई सचिन राजेंद्र पवार यांनी ३० हजारांची मागणी केली. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

दरम्यान यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळसेकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे, यांच्या पथकाने सापळा रचून शिपाई सचिन राजेंद्र पवारला लाच घेताना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अंबड लिंकरोड वरील भंगार गोदमाला भीषण आग, तीन तासानंतर आग आटोक्यात

नाशिक : नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील मीना ट्रेडर्स या भंगार गोदामाला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आटोक्यात आणण्यात यश आले असले तरी आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मात्र लाखोंचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

नाशिकच्या सातपूर परिसरातील अंबड लिंकरोड आगीची घटना घडली. येथील ज्वलनशील पदार्थ साठवलेल्या गोडावुनला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हे गोदाम प्लास्टिकचे असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. तसेच धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. महापालिका अग्निशमन विभाग आणि एमआयडीसीच्या बंबांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली.

अंबड लिंक रोडवरील शाबू मकबल अहमद खान यांनी आझाद नगर भागात भाड्याने गोडाऊन घेतले आहे. या ठिकाणी ज्वलनशील साहित्यासाठी गोडाऊन तयार केले होते. आज सकाळी या ठिकाणी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामध्ये गोडावूनमधील फोमसह इतर साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता अधिक असल्याने जवळपास तीन तासानंतर आग आटोक्यात आली.

दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच शहरातील सातपूर, अंबड, एमआयडीसी, मुख्यालयाचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी, संजय लोंढे आदीं अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे कारण अस्पष्ट असून एक महिन्यातच या गोदामाला दुसर्‍यांदा आग लागल्याने संबंधित घटनेची पोलिसांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी अग्निशमन विभागाकडून करण्यात येते आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

पोलिसांच्या माहितीनुसार, आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे. त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याच पानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय शिरच्छेद करणाऱ्याला २ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले आहे.

मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, ज्या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली आहे, त्याच्या प्रोफाइल पिक्चरवर पाकिस्तानचा झेंडा आहे. या संदर्भात फेसबुकला ईमेल पाठवून या पेजबाबत माहिती मागवण्यात आली आहे.

सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची गेल्या दोन वर्षांत ही ११वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या क्रमातील पहिली धमकी २४ एप्रिल २०२० रोजी देण्यात आली होती. तेव्हापासून धमक्यांची मालिका सुरूच आहे.

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली; दोन खलाशी बेपत्ता

रत्नागिरी : रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवरील एकूण पाच जणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.

या दोघांचा शोध सुरू असून, ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीवर हे पाच जण मासेमारी करण्यासाठी निघाले होते. मासेमारीसाठी समुद्रात गेले. मात्र त्यानंतर अचानक ही बोट बुडाली. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही बोट समुद्रात कशी बुडाली याबाबत माहिती समोर आलेली नाही.